राज्य सरकारकडून दुष्काळाचे राजकारण- राधाकृष्ण विखे पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

राज्य सरकारकडून दुष्काळासारख्या गंभीर प्रश्‍नावरही राजकारण केले जात असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

हिंगोली जिल्ह्याच्या दौर्‍यावर विरोधी पक्षनेते विखे पाटील बुधवारी दाखल झाले. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी भागातील शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खा. राजीव सातव यांच्यासह काँग्रेस पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. पिंपळदरी येथील शेतातील पाहणीनंतर विखे पाटील यांनी विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर यांना फोन लावुन जिल्ह्यातील औंढा, वसमत तालुक्यात दुष्काळ सदृष्य परीस्थिती असतांना या दोन्ही तालुक्यांना दुष्काळाच्या यादीतून वगळल्याबाबत जाब विचारला असता आयुक्तांनी यासंदर्भात माहिती घेण्याचे सांगताच विभागीय आयुक्तांना विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी खडेबोल सुनावले. शेतकर्‍यांच्या अडीअडचणी जाणुन घेत या भागातील शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला. यानंतर पत्रकारांशी बोलतांना राज्य सरकारकडुन दुष्काळाच्या बाबतीत देखील राजकारण केले जात असल्याचा आरोप करत सरकारने संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देतांना राजकारण करू नये असे आवाहन केले.

तहसीलदारांची दांडी
विरोधी पक्षनेते औंढा तालुक्याच्या दौर्‍यावर आले असतांना तहसीलदार माचेवाड बैठकीसाठी गेल्याने त्यांनी नायब तहसीलदारांना पाठविले होते. यावेळी तहसीलदारांची विचारणा केल्यानंतर ते नसल्याचे समजताच विखे पाटील यांनी पिंपळदरीत नदीकाठच्या भागात पीक कापणी प्रयोग घेतल्याने चांगलेच नायब तहसीलदारांना धारेवर धरले. शेतकर्‍यांच्या शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी महसुल अधिकार्‍यांनी जवाबदारीने काम करावे असे खडेबोल विखे पाटील यांनी नायब तहसीलदारांना सुनावले.