डॉ. आ. ह. साळुंके यांना भाई उध्दवराव पाटील जीवन गौरव पुरस्कार प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राकेश कुलकर्णी । धाराशिव

महाराष्ट्रातील शेतकरी व कष्टकरी जनतेचे नेते, झुंजार सेनानी भाई उध्दवराव पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या नावाने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंके यांना प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे माजी न्यायमुर्ती बी. एन. देशमुख यांची उपस्थिती होती.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात काल गुरुवार, १२ जुलै रोजी सायंकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भाई उध्दवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ. आ. ह. साळुंके म्हणाले की, एकदा घेतलेली निष्ठा भाई उध्दवराव पाटील यांनी आयुष्यभर सांभाळली. शेतकरी, कष्टकऱ्यासाठी भाई उध्दवराव पाटील यांनी आपले उभे आयुष्य वेचले. त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा माझा सन्मान आहे. असे सांगून तरुण पिढीने डोळस व चिकित्सक व्हावे लागेल. या समाजात कधी नव्हता इतका दुरावा जाती जाती मध्ये आज निर्माण केला जात आहे. विचार करायला वाव दिल्याशिवाय नवनिर्मितीची क्षमता खुलू शकणार नाही. येथून पुढच्या प्रत्येक पिढीच्या बुध्दीची मोहोर फळामध्ये रुपांतरीत होईल अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल आणि सामाजिक एैक्याशिवाय हे शक्य होणार नाही. मनुस्मृती अनुजही संपलेली नाही, असे सांगून तरुणांनी सावध राहून हा देश जपावा लागेल. आम्ही म्हणू तेच सत्य, आम्ही म्हणू तेच ऐकावे लागेल हा दुराग्रह या देशाला तोडल्याशिवाय राहणार नाही. शेतीच्या दुरावस्थेबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असून एक लाखापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करत असतील तर या समाजाचे आरोग्य धोक्यात आले आहे, हे लक्षात घ्यावे लागेल असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले की, डॉ. आ. ह. साळुंके ही एक व्यक्ती नसून तीने समष्टीचे स्वरुप धारक केले आहे. आ. ह. साळुंके यांचे पुरोगामी चळवळीतील योगदान अतुलनिय असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

भाई उध्दवराव पाटील पुरोगामी विचारमंच धाराशिव यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. स्मृतीचिन्ह व मानपत्र देवून डॉ. आ. ह. साळुंके यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. मानपत्राचे वाचन व्ही. के. देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप न्यायमुर्ती बी. एन. देशमुख यांच्या भाषणाने झाला. भाई धनंजय पाटील यांनी प्रमुख अतिथीचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अर्जुन जाधव, सुत्रसंचालन रवींद्र केसकर तर आभार प्रदर्शन प्रा. रवी सुरवसे यांनी केले.