विमुक्ता- पर्यावरणवादी पंतप्रधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डॉ. ज्योती धर्माधिकारी

‘या ग्रहगोलावर उद्याचे जीवन सुरक्षित करायचे असेल तर आपण आजच जबाबदारीने वागले पाहिजे. मी सर्व जागतिक नेत्यांना आणि खासगी क्षेत्रातील वित्तीय संस्थांना आवाहन करते की, एकत्र या आणि जगातील सर्वात असुरक्षित देशांना परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी, पांमणासाठी आणि हवामानाच्या संकटाचा सामना करण्यासाठी मदत करा. त्यांना आवश्यक तो निधी त्वरित द्या. तरच आपल्या पुढील पिढीसाठी हे जग जगण्यालायक शिल्लक राहील.’ असं ठामपणे सांगणारी मिया मोटली, बार्बाडोसची पंतप्रधान या दशकातली अत्यंत संवेदनशील अशी हवामान कार्यकर्ती आहे.

हवामानाबद्दलच्या संदर्भात अत्यंत गंभीर आणि निर्वाणीचे इशारे तिने दिले आहेत. तेवढेच करून मिया मोटली थांबली नाही, तर तिने त्यासोबतच कृती आराखडाही दिला. वातावरण बदलाच्या संदर्भामध्ये बार्बाडोस हे कॅरेबियन देशांमधील सर्वात जास्त संवेदनशील राष्ट्र आहे. हा पूर्व कॅरेबियन समुद्रातील द्वीपदेश आहे. गेल्या काही वर्षांत वाढत्या समुद्रपातळीमुळे मोठय़ा प्रमाणात महाकाय चक्रीवादळे हा देश सहन करत आहे. चक्रीवादळांमुळे किनारपट्टीचे घर्षण होऊन पूर परिस्थिती निर्माण होत आहे. पंतप्रधान मिया मोटली हवामान बदलाच्या बाबतीमध्ये चळवळीची कार्यकर्ती असून त्यासंदर्भात सर्व देशांनी आणि खासगी क्षेत्रांना त्वरित काही ना काही ठरवायला हवे, असे ती वारंवार सांगत आहे. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी कडक निर्बंध लादायला हवेत असे मानणाऱयांपैकी ती एक आहे.

विकसित देश आणि विकसनशील देश या दोन्हीमध्ये वातावरण बदलाच्या बाबतीत सारखीच जबाबदारी आहे. या देशांना वातावरण बदलण्यासाठी फार मोठय़ा आर्थिक पुरवठय़ाची गरज आहे. बार्बाडोस देशाने 2022 मध्ये एक कृती आराखडा तयार केला होता. त्यामध्ये विकसित देशांनी गरीब देशांना वातावरण बदलाच्या संदर्भामध्ये आर्थिक मदत करायचे नियोजन होते. गरीब देशांवरील कर्जाचे संकट कमी करून वातावरण बदलाच्या आणीबाणीच्या संकटाशी सामना करायला ‘ब्रिजटाऊन इनिशिएटिव्ह’द्वारे वित्त पुरवठा एक ट्रिलियन इतका वाढवण्याची शिफारस केली. ज्याप्रमाणे दुसऱया महायुद्धानंतर 1948 मध्ये ‘मार्शल प्लॅन’अंतर्गत अमेरिकेने पश्चिम युरोपला 13 अब्ज रुपयांची मदत दिली होती. तेवढय़ाच तातडीने वातावरण बदल हा मुद्दा हाताळला पाहिजे असे मिया मोटलीचे मत आहे. उत्तर आणि दक्षिण या दोन्ही भागांमध्ये भांडवलाच्या किमतीमध्ये भयंकर तफावत आहे. त्यामुळे जिथे अर्थपूर्ण प्रगती होऊ शकते तिथूनच वातावरण बदलाच्या कामाला सुरुवात केली पाहिजे. या अर्थ पुरवठय़ासाठी मिया मोटली या जागतिक स्तरावर लढा देत आहे. तिने पॅरिसमधील ‘कॉप 26’च्या नवीन ग्लोबल फायनान्सिंग पॅकची आठवण करून दिली आहे.

मियाचा जन्म 1 ऑक्टोबर 1965 मध्ये राजकीय कुटुंबात झाला. मिया मोटली बार्बाडोस प्रजासत्ताक देशाची पहिली पंतप्रधान आणि देशाच्या स्थापनेपासूनची आठवी पंतप्रधान आहे. हे पद स्वीकारणारी ती पहिलीच स्त्री आहे. देशात प्रजासत्ताक स्थापन होण्यासाठी तिने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि ती 2018 पासून पंतप्रधानपदी विराजमान आहे. 2022 मध्ये लगेच दुसरीही टर्म तिने जिंकून घेतली आणि पंतप्रधान म्हणून नियुक्त झाली. मिया मोटलीचे शिक्षण बार्बाडोस येथील क्वीन्स कॉलेजमध्ये झाले तर ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथून तिने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. 1991 मध्ये जेव्हा ती राजकारणात आली तेव्हा पहिल्यांदा ती हरली आणि विरोधी पक्षांमध्ये जाऊन बसली. 1994 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ती संसदेमध्ये सन्मानाने जाऊन बसली.

संसदेत असताना मिया मोटलीकडे शिक्षण खात्याचे मंत्रीपद सोपवण्यात आले. त्याचप्रमाणे ‘युथ अफेअर्स अँड कल्चर’चे मंत्रीपदही सोपवण्यात आले. केवळ 29 व्या वर्षी तिने पंतप्रधान ओवेन ओर्थर यांच्या हाताखाली मंत्रीपद सांभाळले होते. शिक्षणमंत्री असताना ‘इच चाइल्ड मॅटर्स’ या पुस्तकाची ती सहलेखिका होती. तसेच तिने जनरल पोटरी म्हणूनही काम केले आहे. शिक्षण मंत्रालयामध्ये त्यांनी कॅरिकोमचे मुख्याधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण काम केले. 2001 मध्ये तिच्याकडे बार्बाडोस जनरलच्या वकील असा कार्यभार सोपवण्यात आला. वातावरण बदलाच्या संदर्भामध्ये बार्बाडोस हे कॅरेबियन देशांमधील सर्वांत जास्त संवेदनशील राष्ट्र. बार्बाडोसची पंतप्रधान मिया मोटली हवामान बदलाच्या बाबतीमध्ये चळवळीची कार्यकर्ती असून त्यासंदर्भात सर्व देशांनी आणि खासगी क्षेत्रांना त्वरित काही ना काही ठरवायला हवे, असे ती वारंवार सांगत आहे. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी कडक निर्बंध लादायला हवेत असे मानणाऱयांपैकी ती एक आहे. 1994 ते 2008 ती संसदेत होती. बार्बाडोस जनरलची वकील म्हणून तिने कार्यभार सांभाळणारीदेखील ती पहिलीच महिला होती. अमेरिकन आंतरसंवाद समितीची सदस्याही होती.

2008 आणि 2023 या दोन्ही निवडणुकीत तिला विरोधी बेंचवर बसावे लागले. 2018 मध्ये निवडणुका झाल्या आणि तिच्या पक्षाने संपूर्ण बहुमत सिद्ध करत सरकार स्थापन केले. यावेळी पंतप्रधानपदी मिया मोटलीचे नाव सुचवण्यात आले. त्याच वेळी अर्थमंत्रीपदही तिच्याकडेच होते.

अमेरिकेतील जनरल असेंब्लीला संबोधित करताना मिया हवामान बदलाविषयी पहिल्यांदा बोलली. कॅरेबियन कम्युनिटीच्या मुख्याधिकारी म्हणून तिच्याकडे सूत्रे सोपवल्यानंतर विकसित देश आणि विकसनशील देशांच्या हवामान बदलांच्या भूमिकेबद्दल तिची काही ठोस मते तयार झाली. मिया मोटलीने देशातील हुकूमशाही नष्ट करण्यासाठी विधेयक संसदेमध्ये मांडले आणि एलिझाबेथ द्वितीय यांची साम्राज्ञी पदावरून बोळवण केली. बार्बाडोस प्रजासत्ताक देश म्हणून जाहीर झाला. खरं तर देश स्वतंत्र होऊन 54 वर्षे झाली होती, परंतु बार्बाडोस देशावर देशवासीयांचे राज्य नव्हते. देशाने तिच्या मार्गदर्शनाखाली संसदीय पद्धत स्वीकारली. 55 व्या स्वतंत्रता वर्षगाठच्या दिवशी देम मेंशन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. यावेळी मिया मोटलीने हवामान बदलाबद्दल सर्व देशांना संबोधित करणारे भाषण केले. वैश्विक नैतिक नेतृत्व आणि हवामान बदलाच्या विरोधात लढाई त्याच वेळी सुरू झाली. आर्थिक आणि तांत्रिक असमानतेबद्दल, वंशवाद आणि ‘कोविड-19’च्या विरोधातल्या असमान लस वाटपाबद्दलही ती बोलली. 2021 चा चॅम्पियन ऑफ अर्थ, लाईफटाईम अवॉर्ड तसेच केनिया ऑर्डर ऑफ गोल्डन हार्ट अशा विविध पुरस्कारांनी मिया मोटलीला सन्मानित करण्यात आले आहे.

(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय,
जालना येथे इंग्रजी विभागप्रमुख आहेत)