वारीतील भाविकांना पायाभूत सुविधा द्या; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनानंतर दोन वर्षांनी विठूरायाच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला केली आहे. वारीला येणाऱ्यांमध्ये महिला भाविकांची संख्या मोठी असल्याने त्यांची सुरक्षितता आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वारीनिमित्त डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेपाची झीज होणे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानचा आराखडा, भक्तनिवास आणि पंढरपूर शहराची स्वच्छता आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘मंदिर आणि मंदिर परिसरात आवश्यक असणारी कामे करीत असताना या मंदिराचे पावित्र्य राखले जाण्यासाठी पुरातत्व विभागाने कालबद्ध आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ाची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा नियोजन यांनी सहकार्य करत सोलापूर जिल्हा प्रशासनाने आवश्यक असणारी सर्व कार्यवाही करावी. सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाळय़ात कोणती कामे करता येतील, याचे नियोजन करावे आणि पावसाळय़ानंतर दीर्घकालीन कामांचे नियोजन करून कामे पूर्ण करण्यात यावीत.’

‘दोन वर्षांनंतर वारी होत असल्याने यावर्षी वारीसाठी येणाऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन गर्दीचे नियोजन करा, वारकऱ्यांशी संयमाने वागा. श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेप लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे रुक्मिणी मंदिरात एक्झॉस्ट पंखे तातडीने लावण्यात यावे. वारीत सहभागी होणाऱया वारकऱ्यांना गरज भासल्यास मोफत उपचार द्या. भक्तनिवासचे काम तातडीने पूर्ण करा’, अशा सूचनाही त्यांनी केल्या.