मुद्दा – केअरिंग हँडस्

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. नीलम ताटके

नावाप्रमाणेच वृद्ध आणि मुलं यांची काळजी घेणारी तळेगाव दाभाडे येथील संस्था केअरिंग हँडस्. ‘वृद्ध आणि मुलं एकत्र राहिली तर…’ ही कल्पनाच छान वाटते ना ! पण हे प्रत्यक्षात आणलंय या संस्थेने. याविषयी बोलताना संस्थेचे अंबादास चव्हाण म्हणाले, ही मुलं इथल्या वृद्धांशी गप्पा मारतात. त्यांचा वेळ छान जातो. इथल्या आजी मुलांना फिरायला नेतात. संस्था नगर जिह्यातील आदिवासी, भटक्या जाती- जमातीतील बालकांच्या जीवन बदलासाठी समर्पित भावनेने कार्य करते. संस्थेचे विश्वस्त शैलेंद्र मसलेकर म्हणाले, सुरुवातीला इथे मुलं आली की, ती सरळ साधं बोलायची नाहीत. सतत शिव्या देणं, भांडणं करणं, पण हळूहळू त्यांच्यात बदल झाला आणि हे पाहून त्यांच्या गावातल्या इतर मुलांच्या पालकांनी त्यांना आपणहून संस्थेत आणलं.

आदिवासी समाज भटकत असल्याने त्यांच्या आयुष्याला स्थैर्य नसतं. त्यामुळे मुलांना शिक्षण नाही, मुख्य प्रवाहात येणे दुरापास्तच! याचा परिणाम म्हणजे समाजात स्थान नाही. व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, जात पंचायत, अनियंत्रित लोकसंख्या यामुळे मागासलेपण आहे. यातून त्यांना बाहेर काढणं आवश्यक आहे. तरच पुढच्या पिढा शिकतील व मुख्य प्रवाहात येतील. यासाठी केअरिंग हँडस् संस्था विविध प्रकल्प राबवत आहे. संस्थेचे उद्दिष्ट व्यापक आहे. शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, बाल भिक्षुकी, बालकामगार, बालविवाह रोखणे, कालबाह्य प्रथा, परंपरांचे निर्मूलन करणे, आदिवासी, भटक्या जमाती आणि इतर उपेक्षित समाजातील गरीब, गरजू, तरुण आणि स्त्रियांना आरोग्य, रोजगार, शिक्षण उपलब्ध करून देणे. उत्कर्ष बालघर येथे आदिवासी व भटक्या जमातीतील अनाथ, निराधार, उपेक्षित, अत्यंत गरजू अशा 85 बालकांचे संरक्षणासह संपूर्ण संस्कारक्षम संगोपन केले जाते. या प्रकल्पावर बारा जणांची टीम काम करते.

मुलांमधले गुण ओळखून त्यांना त्या विषयात प्रावीण्य मिळविण्यासाठी मदत केली जाते. या मुलांचे भवितव्य तुम्हाला काय दिसते असं विचारले असता मसलेकर म्हणाले, अतिशय उज्ज्वल भविष्य आहे. एका विद्यार्थ्याने अतिशय स्पष्ट संस्कृत उच्चारात ‘पसायदान’ म्हटले आणि याची खात्री पटली.

बेड रिडन पेशंटची काळजी घ्यायला कुटुंबात कुणाला वेळ नसतो. अशा पेशंटची व्यवस्थित काळजी संस्था घेते. अशा पेशंटची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. पालकांबरोबर सतत भटकंती करणाऱ्या बालकांना शाळेची गोडी लागावी म्हणून वाळुंज, पिंपळगाव माळवी, दहीगाव, घोडेगाव या गावांमधून पारधी, भिल्ल, डोंबारी वस्त्यांवर 3 ते 5 वयोगटातील बालकांसाठी संस्कार वर्ग चालवले जातात. नियमित पौष्टिक आहाराद्वारे या बालकांना कुपोषणापासून वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या बालकांमधील नैसर्गिक काटकपणा, चपळाई लक्षात घेऊन त्यांना विविध खेळांचे शास्त्र्ाशुद्ध प्रशिक्षण दिले जाते.

त्यांना यशस्वी व्यक्तींचे अनुभव सांगितले जातात, ज्यातून त्यांच्यापुढे योग्य आदर्श असतील. संस्थेच्या शिक्षिका त्यांना स्वच्छतेचे, वागण्याबोलण्याचे धडे देतात. ‘केअरिंग हँडस’ या संस्थेचा आवर्जून उल्लेख करावा असा प्रकल्प म्हणजे मधुनंदा पेरेंटस् होम. यात ज्येष्ठांना समवयस्कांसोबत निवासाची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय, एकल ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटरची सोय आहे. वाघोली येथे ज्येष्ठांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध आहे. येथे मनोरंजन, वाचनालय, ध्यानमंदिर, बैठे खेळ यांचा आनंद ज्येष्ठांना घेता येतो.