वीरमाता जीजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रसाद कारंडे यांनी सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा कार्यभार स्वीकारला. व्यवस्थापन परिषदेच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मावळते प्रभारी कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांनी डॉ. प्रसाद कारंडे यांना कुलसचिव पदाचा कार्यभार सोपवला.
प्रशासकीय कामकाजात गतिमानता, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्वासाठी डिजिटायझेशनवर भर देऊन, सर्वांच्या सहकार्याने काम करण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याचे डॉ. प्रसाद कारंडे यांनी पदभार स्वीकारते वेळी सांगितले. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी कारंडे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.