
- डॉ. विद्यासागर पाटंगणकर
दीपोत्सवाचा सण म्हणजेच दिवाळीचा महोत्सव या सणामागे फार मोठा अर्थ दडला आहे. दीपोत्सवाच्या निमित्ताने रात्र आणि दिवस यातील अंतर नाहीसं करणं हेच दिवाळीचं मुख्य अंग आहे. दुःखाकडून आनंदाकडे, असत्याकडून सत्याकडे, तमाकडून तेजाकडे असा हा माणसाच्या जीवनाचा विकासक्रम आहे. दिवाळीच्या सणातून ‘तमसो मा ज्योतिर्गमय–मृत्योर्मा अमृतं गमय’ असाच अमृताकडे नेणारा मार्ग सुचवायचा आहे. माणसाच्या जीवनाचा उत्कर्ष हेच सर्व सण–वार–परंपरा यांचं ध्येय आहे. त्याचंच दिग्दर्शन दिवाळीमधून घडतं.
धनत्रयोदशीपासून कार्तिक शुक्ल द्वितीयेपर्यंत जो महोत्सव सर्व हिंदुस्थानभर आणि हिंदुस्थानबाहेरही हिंदू कुटुंबीयांत साजरा होणे, त्यास ‘दीपावली’ किंवा दिवाळी असे म्हटले गेले आहे. विविध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संकेत या काळात एकत्र आलेले दिसतात.
‘धनत्रयोदशी’ला धनतेरस असं ग्रामीण भागात म्हणतात. यासंबंधी एक रंजककथा पुराणामध्ये सापडते. प्राणहरण करण्याचं कार्य करणाऱ्या यमदूतांना यमानं विचारलं की, हे प्राण हरण करण्याचं कठोरकर्म करताना तुम्हाला कोणाची कधी दया आली होती काय? यावर दूतांनी सांगितलं की, एकदा हंस नामक राजा मृगया करीत राजधानीपासून बराच दूर गेला आणि तिथून जवळच असणाऱ्या हैम राजाच्या राजवाडय़ात विश्रांतीसाठी थांबला. या वेळी हैम राजाला पुत्र झाल्यामुळं तो आनंदात होता आणि षष्ठाrदेवतेचा म्हणजे सटवाईचा उत्सव साजरा करीत होता. सटवाईनं स्त्राrरूप घेऊन राजाला सांगितलं की, ‘या मुलाचं लग्न होताच त्याच्या चौथ्या दिवशी हा मुलगा मरण पावणार आहे. त्याला सर्पदंशाचं भय आहे.’ हे ऐकून राजाला अत्यंत वाईट वाटलं. त्यानं अनेक दैवी उपाय योजले. हंस राजानं या मुलाला वाचवण्याची जबाबदारी पत्कारली आणि सर्पदंशापासून मृत्यू चुकविण्यासाठी यमुनेच्या डोहात एक प्रासाद बांधून दिला. योग्य काळी मुलाचा विवाह झाला आणि हा विवाहसोहळा चालू असतानाच सर्पदंशानं त्या मुलाचा मृत्यू झाला. अर्थात या मुलाचे प्राण हिरावून नेण्याचं कठोर कर्म यमदूतांना करावं लागलं. एवढय़ा आनंदाच्या प्रसंगी हा अनर्थ ओढवलेला पाहून यमदूतांना दया आली आणि असा प्रसंग पुन्हा कोणावरही येऊ नये अशी त्यांनी यमधर्माला प्रार्थना केली. यमराजाने सांगितले की, अश्विन त्रयोदशीपासून पाच दिवस जो सायंकाळी दीपोत्सव करील त्यास अपमृत्यू येणार नाही. अर्थात अपमृत्यूवर मात करण्याची शक्ती या त्रयोदशीमध्ये आहे. असे वरदान दिवाळीच्या या प्रथम दिनाला मिळाले आहे.
दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी होय. श्रीमंत भागवतामध्ये अशी कथा आहे की, द्वापारयुगात नरकासुर किंवा भौमासुर नामक राक्षस प्रचंड माजला होता. त्याला एक लक्ष स्त्रियांबरोबर एकदम विवाहबद्ध व्हायचं होतं. त्यानं सर्व स्त्रियांना जबरदस्तीनं आणून बंदिखान्यामध्ये ठेवलं होतं. तसंच इतरही देव-देवतांच्या मौल्यवान चीजवस्तू हरण करून आणल्या होत्या. श्रीकृष्णानं सत्यभामेसह जाऊन त्याचा वध केला आणि स्त्रियांना बंदिवासातून मुक्त केलं. स्त्राrमुक्ती आंदोलनाचं हे पहिलं पाऊल म्हणता येईल. श्रीकृष्णानं प्रथम स्त्राrमुक्ती केली. चतुर्दशीच्या दिवशी प्रातःकाळी नरकासुरास ठार मारून कृष्णानं विजय मिळविला. या आनंदाप्रीत्यर्थ सर्वांनी मंगलवाद्ये वाजविली, गीते गायिली; अभ्यंगस्नान केलं, मंगलस्नान केलं, म्हणून आजही या दिवशी सर्वजण दिवे ओवाळून अभ्यंगस्नान करतात आणि आनंद व्यक्त करतात.
दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्याची पद्धत आहे. पूर्वी बळीनामक राजा होऊन गेला. त्यानं आपल्या वैभवाच्या, संपत्तीच्या आणि पराक्रमाच्या बळावर देवांनाही बंदिस्त केले. त्यावेळी श्रीविष्णूनं वामनाचं रूप घेऊन सर्व विश्व जिंकून घेतलं. सर्वांबरोबर लक्ष्मीचीही सुटका झाली. लक्ष्मीची असुराच्या तावडीतून सुटका झाली म्हणून सर्वांना आनंद झाला. तिचे वास्तव्य सर्वांच्याच घरात असावं म्हणून या दिवशी तिची पूजा करण्याचा प्रघात पडला. कार्तिक महात्म्य ग्रंथात एक निराळी कथाही आढळते. त्यानुसार या अमावस्येला ज्या घरात अंधार दिसेल तिथं लक्ष्मी जात नाही आणि जिथं दीपोत्सव असेल तिथेच ती वास्तव्य करते.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा अर्थात पाडवा. नव्या वर्षाचा प्रारंभ दिन. याच दिवशी बटुवेष धारण करून वामनानं फक्त तीन पावलं जागा मागितली. यावेळी बळीची भक्ती आणि श्रद्धा पाहून वामनानं त्याला असं वरदान दिलं की, मी जरी तुला पादाक्रांत केलं असलं, तरी तुझी आठवण चिरकाल राहावी यासाठी कार्तिक शुद्ध प्रतिपदेस तुझ्या नावानं लोक आनंदोत्सव साजरा करतील. म्हणून अनेक ठिकाणी शेतकरी आणि इतर लोक शेणाचा बळीराजा करून त्याचं पूजन करतात.
हा सण अत्यंत उदात्त स्वरूपाचा असून यातून प्राचीन काळच्या राजनीतीचं शुद्ध आणि सात्त्विक स्वरूप लक्षात येतं. शत्रूस पादाक्रांत केल्यावरही त्याच्यातील उत्तम गुणांची पारख करून त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे वागवीत याचं हे बोलकं उदाहरण आहे.
याच दिवशी कृष्णाच्या सल्ल्यानुसार इंंद्रयाग न करता गोवर्धनपूजा केल्यामुळे इंद्रानं प्रचंड वृष्टी केली आणि श्रीकृष्णानं करांगुलीवर गोवर्धनपर्वत धारण केला. म्हणून या दिवशी अन्नाचा मोठा ढीग म्हणजेच अन्नकूट करून हा महोत्सव साजरा करतात.
कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस यमद्वितीया नावानं प्रसिद्ध आहे. त्यालाच भाऊबीज असंही म्हणतात. या दिवशी मृत्यूदेव यम यानं आपली भगिनी यमी हिच्या घरी जाऊन तिला वस्त्रालंकार दिले. तिच्या घरी जाऊन आनंदानं भोजन केलं, अशी कथा आढळते. भाऊबीजेचा दिवस म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचं प्रतीक आहे. बंधु-भगिनींनी एकमेकांबद्दल प्रेमभाव बाळगून सामाजिक उन्नती साधावी, हा यामागचा हेतू आहे.
नरकासुराच्या वधातून दृष्टांचा संहार आणि सज्जनांचं रक्षण हेच ब्रीद दिसतं; तर भाऊबीजेतून समाजात सर्वत्र बंधुभाव नांदावा, परस्परांत कौटुंबिक भावना वृद्धिंगत होऊन समाजाचं कल्याण व्हावं हाच दृष्टिकोन दिसतो. दिवाळीमध्ये गोडधोड पदार्थ खाण्यास करून, मंगलस्नान-अभ्यंगस्नान, दिवे ओवाळणे, नातेवाईक आप्तेष्ट-सोयरे यांच्या भेटीगाठी यांनाही महत्त्व आहे. कारण त्यातूनच परस्परांत प्रेम-आकर्षण-मैत्री यांची वाढ होत असते.
दीपावली-उत्सव शास्त्राrय, पौराणिक आणि सामाजिक अशा सर्व दृष्टींनी महत्त्वपूर्ण आहे. या सणाच्या निमित्तानं सामाजिक ऐक्य-सद्भाव-सौहार्द, प्रेम, मैत्र, श्रद्धा यांचं अत्यंत मनोहारी दर्शन घडतं. तुकोबारायांनी संत-सहवासाला दिवाळीच्या सणासारखे महत्त्व दिलं. ते म्हणतात, ‘संत येती घरा। तोची दिवाळी दसरा।’ यावरूनही दिवाळीच्या सणाला केवढं महत्त्व आहे हे स्पष्ट होतं. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानाची दिवाळी’ असा शब्दप्रयोग केला आहे. असा हा दिवाळीसण सर्वांना सुख-समृद्धीचा भरभराटीचा ठरो!
(लेखक संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत.)



























































