संन्याशाला फाशी : गोशाळेच्या भोंगळ कारभाराचे खापर वाहन चालकावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

चाऱ्या अभावी गोशाळेतील गायींची होणारी उपासमार, अस्वच्छता आणि दुर्गंधी या विषयी दै. ‘सामना’ने आसूड ओढल्यानंतर मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या सगळ्या भोंगळ कारभाराला एका वाहन चालकाला जबाबदार धरले आहे. सदर वाहन चालकाला कारणे दाखवा नोटीस बजावून दोन तासात नोटिशीला उत्तर देण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे. समितीची ही हास्यास्पद कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ या म्हणीचा प्रत्यय देते.

यमाई तलाव येथील विस्तीर्ण जागेवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची गोशाळा उभारली आहे. भक्तांनी देवाच्या चरणी दान केलेल्या गायींचे संगोपन या गोशाळेमध्ये केले जाते. लहानमोठ्या अशा एकूण १५० गायींचे संगोपन याठिकाणी केले जाते. यासाठी एक गोशाळा व्यवस्थापक आणि आठ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

१५० गायींच्या चारापाण्यासाठी वर्षांला ४२ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी ३० लाख हे चाऱ्यासाठी आणि १२ लाख हे पशुखाद्यासाठी खर्च केले जातात. गोशाळेतील एकूण गायींची संख्या आणि त्यांच्या संगोपनासाठी केला जात असल्याचा खर्च पाहता गोशाळेतील गाई या धष्टपुष्ट आणि सशक्त दिसायला हव्यात. पण तसे दिसत नाही काही मोजक्या गाई सोडल्या तर बहुतांश गाई आणि त्यांचे पाडसे मरतुकडी दिसतात.

गायींच्या पाठीवरील बरगड्या आणि भुकेने व्याकुळ झालेले त्यांचे केविलवाणे चेहरे पाहिले की, ४२ लाख रुपयांचे खाद्य या जनावरांना दिले जाते का याबाबत साशंकता वाटते. पोटभर चारा नसल्याने गोशाळेत उपलब्ध असलेली कागदाची रद्दी, कापडाचे तुकडे खाऊन गायी आपले पोट भरत असल्याचे दिसून आले.

समितीच्या या सगळ्या भोंगळ कारभारावर दैनिक सामनाने प्रकाशझोत टाकल्यानंतर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी मंदिर समितीचे ट्रॅक्टर चालक दत्तात्रय देशमुख आणि लिपिक अरुण सलगर यांना कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ही कारवाई म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी असंच म्हणावे लागेल