
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी जिल्ह्यातील भूजलपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात ७७ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. एकिकडे तीव्र पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे शासनाने केवळ ४ तालुक्यातील ५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे सुरु केले आहे. जिल्ह्यातील ८१ खाजगी विहिरी अधिग्रहण केल्या आहेत. अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शासनाने त्वरीत खाजगी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
सध्या ग्रामीण भागातील हातपंप व विद्युतपंप पाण्याअभावी कोरडेठाक पडले आहेत. शिवाय १ हजार २१० सार्वजनिक हातपंप व विद्युतपंप पाण्याअभावी बंद पडल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणांसाठी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र कागदोपत्रीच नियोजन केले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. यात परभणी तालुक्यातील चार, पालम ९, पूर्णा ४, गंगाखेड २५, सोनपेठ ९, सेलू ८, पाथरी ३, जिंतूर ११ आणि मानवत ४ गावांचा समावेश आहे. शासनाने पालम तालुक्यातील चाटोरी, पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे, गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा आणि जिंतूर तालुक्यातील मांडवा आणि करवली या गावांना ५ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दिवसेंदिवस पाणीपातळी खोल जात असल्याने मार्च महिन्याच्या प्रारंभीच पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. एप्रिल आणि मे महिना उंबरठ्यावर असताना या महिन्यातच पाणीटंचाईने कळस गाठला आहे. जिल्ह्यातील अनेक बंधाNयातील पाणी आटले आहे. नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. ७७ गावातील शेतकरी व ग्रामस्थ या पाणीटंचाईने अडचणीत सापडले आहेत. जनावरांच्या चाNयांचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. पानवठे, ओढे, नदीचे डोह, नाले गेल्या दोन महिन्यापासून आटल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ग्रामीण भागात सार्वजनिक हातपंप व विद्युत पंप बसविण्यात येतात. ग्रामस्थ या हातपंपांवर पिण्याचे व सांडपाण्यासाठी वापर करण्यात येतो. परंतु, आज घडीला भूजलपातळीत घट होत असल्यामुळे ग्रामीण भागातील सार्वजनिक हातपंप पाण्याअभावी कोरडेठाक पडत असल्यामुळे बंद पडत आहेत. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामस्थांनी शिवारातील शेतामधील बोअर व विहिरीवरुन पिण्याचे पाणी डोक्यावर अथवा बैलगाडीने आणण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ हजार २१० सार्वजनिक हातपंप पाणी नसल्यामुळे बंद पडले आहेत. यामध्ये नादुरूस्त ६५ हातपंपांची दुरूस्ती करून गावांची तहान भागविण्यात येत आहे. परंतु, शेकडो गावातील हातपंप पाण्याअभावी कोरडे पडल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.































































