
सामना ऑनलाईन । मुंबई
मद्यधुंद परिस्थिती गाडी चालवल्याचं उघड झाल्याने एका वकिलाने चांगलाच गोंधळ घातला. नाकाबंदीपासून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या वकिलाला पोलिसांनी रोखायचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाणही केली. सिद्धार्थ सिंग (23) असं या वकिलाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी कुलाब्यातील शहीद भगत सिंग मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी आपल्या बाईकवरून आलेल्या सिद्धार्थने कचाट्यातून निसटण्यासाठी यू टर्न घेत गाडी वळवली आणि त्याने वेगाने निसटण्याचा प्रयत्न केला. पण, एका बाईकस्वार कॉन्स्टेबलने त्याचा पाठलाग करून त्याला छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर अडवलं. पोलिसाने त्याला मद्यसेवन चाचणी घेण्यासाठी सांगितलं असता त्याने उद्धटपणे ते करायला नकार दिला. तो एवढ्यावरच न थांबला नाही, तर त्याने पोलिसाला मारहाण करायला सुरुवात केली.
सुदैवाने पोलिसांचे पथक तिथे वेळीच दाखल झाले आणि त्यांनी सिद्धार्थला ताब्यात घेतलं. त्याच्या रक्त तपासणी अहवालात त्याने जास्त प्रमाणात मद्य सेवन केल्याचं निष्पन्न झालं आहे.



























































