साकीनाक्यात टेलरची हत्या; मृतदेह बेडमध्ये, फरार पत्नीचा शोध सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कौटुंबिक वादातून पत्नीने पतीची हत्या करून मृतदेह दिवाणात लपवल्याची घटना अंधेरीच्या साकीनाका येथे घडली आहे. नसीम खान असे मृताचे नाव आहे. पत्नी रुबीना ही पळून गेली असून साकीनाका पोलीस तिचा शोध घेत आहेत.

मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला नसीम हा टेलर काम करायचा. 2017 मध्ये नसीमचा रुबिनाशी विवाह झाला होता. सध्या ते नवरा-बायको साकीनाका येथील यादव चाळीत भाडय़ाने राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यात प्रचंड वाद होत होते. सतत वाद होत असल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी त्याची समजूत काढली होती. तरीदेखील त्यांच्यात भांडण सुरूच होती. गेल्या आठवडय़ात नसीम आणि रुबिनाचा वाद झाला. वाद झाल्यावर रुबिनाने नसीमची हत्या केली. हत्येनंतर रुबिनाने नसीमचा मृतदेह बेडमध्ये लपवला. भाडय़ाने घेतलेल्या रूमचा करार पूर्ण न झाल्याने नसीमचे वडील त्याला फोन करत होते, मात्र नसीम फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्याने रुबिनाला फोन केला.

तेव्हा नसीमची प्रकृती ठीक नसल्याने तो झोपला असल्याचे त्याना सांगून फोन कट केला. हा प्रकार त्यांना संशयास्पद वाटल्याने ते नसीमच्या घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. नसीमच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने स्थानिकाने याची माहिती साकीनाका पोलिसांना दिली. काही वेळातच साकीनाका पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांना बेडच्या आत नसीमचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. नसीमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. नसीमच्या वडिलांनी रुबिनावर संशय व्यक्त केला आहे. हत्येनंतर रुबिना ही पळून गेली असून तिचा फोनदेखील बंद येत आहे. हत्येनंतर पळून गेलेल्या रुबिनाच्या अटकेसाठी साकीनाका पोलिसांनी पथक तयार केले आहे. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत.

आग्रीपाडा येथे तरुणाची हत्या

आग्रीपाडा येथील कंजारवाडा परिसरात रविवारी मध्यरात्री विकास म्हैसकर या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. विजय रक्ताच्या थारोळय़ात पडल्यावर अज्ञात आरोपीने तेथून पळ काढला. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहेत.