
सामना ऑनलाईन ,पाचोड
संभाजीनगरच्या सिडको बसस्थानकाहून पंढरपूरला जाणाऱ्या बसमध्ये (एमएच १४-बी.टी. ३६५८) बेवारस आढळलेल्या बॅगमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने प्रवाशांसह पोलिसांचा चांगलाच घाम काढल्याची घटना पाचोड येथे सोमवार, २७ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
बस पंढरपूरला जात असताना साडेनऊ वाजेच्या सुमारास पाचोड बसस्थानकावर थांबली. मात्र, एकही प्रवासी तेथे उतरला नाही व बसला नाही. त्यामुळे सीटवर असलेली बॅग कुणाची असा प्रश्न सर्वांनाच पडला. ती बेवारस बॅग पाहून बसमधील प्रवाशांमध्ये धांदल उडाली. वाहकाने पाचोडचे वाहतूक नियंत्रक अशोक डोंगरे यांना या घटनेची माहिती दिली. डोंगरे यांनी तात्काळ पाचोड पोलिसांना कळवले.
माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे, जमादार सुधीर ओहळ, संजय चव्हाण, हनुमान धनवे आदींनी बसस्थानकाकडे धाव घेतली. सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवून त्यांना दुसऱ्या बसने पाठविण्याची पर्यायी व्यवस्था केली. गावापासून एक किलोमीटर अंतरावर जंगलात सुरक्षित स्थळी बस हलविण्यात आली. संभाजीनगरहून बॉम्बशोधक व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. तासाभरानंतर संभाजीनगरहून बॉम्बशोधक पथक आले. तोपर्यंत महामार्गासह बसच्या सभोवताली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॉम्बच्या अफवेने बसकडे जाण्याचे धाडस कुणी केले नाही. परिसर बघ्यांच्या गर्दीने पुळून गेला होता. प्रत्येकाला बॅगमध्ये काय सापडत, याची उत्सुकता लागून होती.
अखेर बॉम्बशोधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब एरंडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गोरखनाथ शेलार, जमादार रामहरी माने, रामचंद्र मात्र, सुनील दांडगे, शत्रुघ्न मडावी, रामेश्वर गोरे, रख्माजी मोडे, श्वान पथकाचे खान यांनी श्वानाद्वारे बस व त्यामधील बॅगची तपासणी केली असता बॅगमध्ये औषधी, कपडे व वह्या, पुस्तके असल्याचे दिसताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बॅगमध्ये असलेल्या पत्त्यावर पोलिसांनी संपर्व साधला असता ही बॅग डॉ. प्रशांत बागवे, रा. शिवाजी चौक, मंठा, जि. जालना यांची असल्याचे समजले. डॉ. बागवे यांनी मंठ्याला जाण्यासाठी चुवूâन या पंढरपूर बसमध्ये जागा पकडण्यासाठी आसनावर बॅग ठेवली. ही बस मंठ्याला जात नसल्याचे समजताच ते खाली उतरले. बॅग काढून घेण्यापूर्वीच बस निघाल्याने ही बॅग बसमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी डॉ. बागवे हे पाचोड पोलीस ठाण्यात हजर झाले असता पोलिसांनी त्यांच्याकडे बॅग सुपूर्द केली.































































