परभणीत बनावट दारु तयार करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी केले गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

विदेशी नामांकीत कंपन्याची बनावट लेबल लावून बाटल्यांमध्ये बनावट दारु भरणाऱ्याचा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईमध्ये चार आरोपींना बनावट दारुसह गजाआड करण्यात यश मिळविले आहे.

परभणी शहरातील मराठवाडा प्लॉट येथून जवळ असलेल्या जाकेर हुसेन नगरात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पहाटे ३च्या सुमारास धाड टाकून मुद्देमालासह चार जणांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख जाफर पी. शेख जलील (२४) हा इसम शफी याच्या राहत्या घरी बनावट दारु तयार करत असे. जाकेर हुसेननगरात धाड टाकल्यानंतर या प्रकरणातील मालक शेख जफर शे. जमील, किशन सुरेश गायकवाड, सनी महाराज (सरदार) आणि शफी या चार जणांनी बनावट दारु तयार करुन बाजारभावाप्रमाणे विक्रीच्या उद्देशान माल तयार केला.

नामांकीत कंपनीच्या बनावटी दारुचा जवळपास १ लाख ५७ हजार ६५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या धाडीमध्ये मॅकडॉल व्हिस्कीच्या ४५३ सिलबंद बॉटल, १८० मॅकडॉल व्हिस्कीच्या १२२३ बॉटल, इंपेरिअल ब्ल्यू १७५, रॉयल स्टग कंपनीच्या १६० बॉटल, ऑफीसर चॉईस कंपनीच्या २० बॉटल, रिअल कंपनीच्या ७ बॉटल आणि इतर तीन बाटल्यांमध्ये दारु सील करण्यासाठी वापरण्यात येणारे ६ कटर व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले. त्यात बिना नंबरची अ‍ॅक्टीव्हा स्कूटी आणि मोबाईल संच जप्त केला.

दरम्यान, ही विदेशी बनावट दारु प्रजासत्ताकदिनी ड्राय-डेच्या निमित्ताने बाजारात विक्रीसाठी येणार असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय व अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील सहय्यक पोलीस निरीक्षक हनमंत पांचाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदिश रेड्डी, घनसावंत, कांदे, पूजा भोरगे व चालक मुंडे यांनी केली.