कर्जत-जामखेडमध्ये आजपासून रंगणार दसरा महोत्सव, पहिल्याच दिवशी विक्रमी उंचीवर फडकणार भगवा स्वराज्य ध्वज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 कर्जत-जामखेडमधील नागरिक आणि आमदार रोहित पवार यांच्या वतीने यंदाही तीनदिवसीय ‘दसरा महोत्सव 2023’चे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (दि. 18) महोत्सव सुरू होणार असून, 21 ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे. महोत्सवात नागरिकांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रकारचे कार्यक्रम पाहता येणार आहेत. केरळ, पंजाब असे राष्ट्रीय तसेच कॅनडा आणि स्पेनमधील आंतरराष्ट्रीय कलाकारांची कला नागरिकांना पाहता येणार आहे.

बुधवारी (दि. 18) सायंकाळी 4 वाजता कर्जतमधील विठ्ठल-रुक्मिणी मैदान, शिक्षक कॉलनी, प्रभाग क्रमांक-8 येथे विक्रमी उंचीवर भगवा स्वराज्य ध्वज फडकवला जाणार आहे. कर्जत-जामखेड दसरा महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि ड्रोनच्या माध्यमातून जगात सर्वाधिक उंचीवर फडकवल्या जाणाऱया भगव्या स्वराज्य ध्वजाला पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार रोहित पवार आणि मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

दि. 19, 20 ऑक्टोबर रोजी कर्जत-जामखेडमधील 16 गावांमध्ये चित्ररथ फिरणार आहे. यामध्ये प्रभू श्रीरामांचे भक्त हनुमानजींच्या भव्य चालत्या-बोलत्या प्रतिकृतीचे सादरीकरण होणार आहे. कर्जत तालुक्यातील कर्जत शहर, राशीन, सिद्धटेक, कुळधरण, चांदे बु., मिरजगाव, चापडगाव, कोरेगाव, शेगुड तसेच जामखेड तालुक्यातील जामखेड शहर, फक्राबाद, अरणगाव, साकत, नान्नज, जवळा, शिऊर, दिघोळ, राजुरी, खर्डा या गावांमधून मिरवणूक जाणार आहे.

यंदाच्या दसरा महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला कार्यक्रम दि. 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत पार पडणार आहे. यामध्ये अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकार सहभाग घेणार आहेत. यामध्ये खर्डा येथील ‘लेझर शो’चे मुख्य आकर्षण असणार आहे. हा लेझर शो ‘दुबई इंटरनॅशनल शो’ तसेच ‘अयोध्या दीपोत्सव’सह देशातील विविध राज्यात दाखवण्यात आलेला आहे. तब्बल 8-10 किलोमीटरवरूनही हा शो पाहता येणार आहे. त्याचबरोबर केरळ येथील प्रसिद्ध डान्स ग्रुपचा डान्स पाहायला मिळणार आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्रदीपक व आकर्षक विद्युत रोषणाईने खर्डा किल्ल्याची सजावट करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पंजाबमधील वीरखालसा ग्रुप ‘गटका‘ या पारंपरिक खेळाबरोबर अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करणार आहे. याचबरोबर ‘कोल्हापुरी मर्दानी खेळ’ हा संघ शिवकालीन व युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करणार आहे. याबरोबरच कॅनडा आणि स्पेन येथील ध्वनियंत्रणा वाजवली जाणार आहे. त्यामुळे कर्जत जामखेडमधील नागरिकांना पुढील 4 दिवस विविध कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.