
हिंदू राष्ट्र हा शब्द संघ जेव्हा वापरतो तेव्हा त्यामुळे सत्तापिपासूपणा नसतो. त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते तर सर्वसमावेशक अर्थाने हा शब्द संघ वापरत असतो. राजकीय स्वार्थासाठी देश तोडण्याचे काम काही लोक देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेविरोधात करतात. त्यांना ओळखणं खूप आवश्यक आहे. सत्तेसाठी संघर्ष करताना विवेक वापरावा, वैचारिक लढा हवा, युद्ध नको, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी रा. स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवात केले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित विजयादशमी उत्सवात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत संबोधन केले.
यावेळी स्वयंसेवक डिजिटली या विजयादशमी कार्यक्रमात सहभागी झाले होते. रविवारी संघ स्थापनेला 95 वर्षे पूर्ण झाला. स्थापनेनंतरचा मोजक्या स्वयंसेवकांसोबतचा हा पहिला सोहळा आहे.
एकमेकांच्या स्वार्थासाठी जे नातं जोडतात ते स्वार्थ संपला की बाजूला होतात. संघाचं नातं तसं नाही. संघाचं नातं हे समरसतेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले. राजकारणातील स्पर्धा ही शत्रूमध्ये चालणारे युद्ध नाही, स्पर्धा निकोप व्हायला हवी, असे मत डॉ. भागवत यांनी व्यक्त केले.
सत्तेसाठी संघर्ष करताना विवेक वापरायला हवा. निवडणुकांमध्ये वैचारिक लढा हवा, युद्ध नको. सामाजिक अंतर निर्माण करणे हे राजकारण नाही. निवडणूक ही स्पर्धा आहे, ही सर्धा खेळीमेळीने व्हावी, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.
सांस्पृतिक मूल्यांचं आचरण करणं आपल्या लक्षात आलं
मोहन भागवत म्हणाले की, कोरोना काळात चांगलं काय आणि वाईट काय हे लोकांना कळालं. अनेक गोष्टी सुधारल्या आहेत. हवा शुद्ध झालीय, नदीनाल्यांचं पाणी चांगलं झालंय. अनेक पक्षी नवीन पाहायला मिळाले आहेत. अनावश्यक गोष्टी सोडल्यानं हा नवा आनंद आपल्याला मिळत आहे. सांस्पृतिक रितीरिवाज आणि स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला कळलं आहे. आपल्या सांस्पृतिक मूल्यांचं आचरण करणं आपल्या लक्षात आलं आहे. पर्यावरणासोबत मित्र म्हणून राहणे आपल्या लक्षात आलं आहे. कोरोनाच्या या माराने काही सार्थक गोष्टींकडे आपल्याला वळवलं आहे. कोरोनामुळं जुन्या परंपरांना देखील महत्त्व आलं आहे, असं ते म्हणाले. कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपल्याला संकल्प करावा लागेल, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले.
2019 मध्ये कलम 370 हटवण्यात आलं त्याचबरोबर 9 नोव्हेंबरला न्यायालयानं राम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय दिला. तो निर्णय संपूर्ण देशानं संयमानं स्वीकारला. त्याचबरोबर सीएएमुळं देशातील कोणत्याही नागरिकाला धोका नाही.’ असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केला आहे.
‘हिंदुस्थानने नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या शेजारील राष्ट्रांशी संबंध सुधारण्याची, मित्रता टिकवण्याची गरज आहे. आपल्यात मतभेद आहेत, मतभेद होत असतात. ते दूर करून चीनला टक्कर द्यायची असेल तर शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले ठेवणं गरजेचं आहे. मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही. आपली मित्रता कोणाला कमजोरी वाटत असेल, अशा राष्ट्रांना आपण जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे,’ असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
हिंदुस्थानने शक्तिशाली व्हावे
यावेळी मोहन भागवत म्हणाले की, हिंदुस्थानने जो काही वार त्यांच्यावर केलाय त्यानं चीन मागे हटलाय. आपल्या सेनेनं चीनला धडा शिकवला. जगातल्या बाकी देशांनाही यामुळं बळ मिळालं. मात्र आता आपल्याला सावध राहावे लागेल. कारण ते काहीही करू शकतात. आपल्याला आता सर्व गोष्टीत चीनपेक्षा ताकतवार व्हावं लागेल. शेजारी राष्ट्रांसोबत संबंध आणखी दृढ करावे लागतील. आपली सर्वांशी मैत्री, पुणाशी भांडण्याचा स्वभाव आपला नाही. मात्र आपल्या स्वभावाला आपली दुर्बलता समजणं चूक आहे. चीनला आपण धडा शिकवला. आपल्याला तयारी वाढवावी लागेल, असंही ते म्हणाले.
समाज तोडू नका
देशाच्या वैविध्यतेला विभाजनाचं नाव दिलं जातं आहे ही बाब चुकीची आहे. हिंदू शब्दावरून वाद निर्माण समाजात दुरावा निर्माण करतात. संघाला काही कारण नसताना बदनाम केलं जातं आहे. संघाबाबत कोणत्याही चुकीच्या गोष्टी पसरवण्याच्या आधी संघाची विचारधारा समजून घ्या असंही आवाहन मोहन भागवत यांनी केलं. आपण सगळे भारतमातेचे सुपुत्र आहोत, भारतीयांना आम्ही हिंदू म्हणतो यात गैर काय? आपलं संपूर्ण शरीर एकच आहे. त्यामध्ये हात वेगळे आहेत, पाठीचा भाग आणि चेहरा हे ज्याप्रमाणे दिसण्यासाठी समान नसतात, पण एकाच शरीराचा भाग असतात. अगदी तसेच देशाचे स्वरुप आहे. सगळे शरीर जसं एकच आहे तसाच आपला देशही एकच आहे मात्र काही लोक त्यातला फरक दाखवण्याचा प्रयत्न करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
स्व म्हणजे हिंदुत्व
स्वदेशी मधला स्व हेच आमचं हिंदुत्व आहे. स्वामी विवेकानंदांनीही स्वदेशीचा मंत्र दिला होता. आम्हीही तेच म्हणतो आहोत. विनोबा भावेंनी स्वदेशी म्हणजे स्वावलंबन हा अर्थ सांगितला आहे. आम्हीही ती गोष्ट मानतोच आहोत, असंही मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं.
फुटीरतावादी एकात्मतेच्या विरोधात
फुटीरतावादी लोक हे राष्ट्रीय एकात्मतेविरोधात काम करत आहेत. तुकडे तुकडे गँग असंही त्यांना म्हटलं जातं आहे. ही गँग देश तोडण्याचं काम करते आहे, अशी टीका मोहन भागवत यांनी केली. कोरोना काळात स्वदेशी हा शब्द चांगलाच प्रचलित झाला.
हिंदू शब्दाला पर्याय व नैतिक आचरण हवे
वास्तविक पाहता हिंदू ही जीवन पद्धती आहे. परंतु, हिंदुत्वाला उपासनेशी जोडून फुटीरतावादी समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत असलेले तत्व जाणूनबुजून ‘हिंदुत्वाला ‘तिरस्कार व टीकेचा पहिला निशाणा बनवितात. हिंदू कोणताही पंथ, संप्रदाय, जाती किंवा प्रांताचा पुरस्कार करणारा नसून सर्वांना जोडणारा शब्द आहे. या शब्दावर कुणालाही आक्षेप असू शकतो. आशय सारखा असेल तर इतर शब्दांच्या उपयोगावर आम्हाला पुठलाही आक्षेप नाही, असे डॉ. मोहन भागवत यांनी प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी मद्यविक्री करून धनार्जनाला नैतिकदृष्टय़ा अयोग्य ठरवले. सांस्पृतिक आणि नैतिक दृष्टीने अयोग्य असलेल्या माध्यमातून होणारे धनार्जन आपली परंपरा नसल्याचे त्यांनी सांगितले.
चीनला हिंदुस्थानने मोठा धक्का दिला अनेक कृत्रिम गोष्टी कोरोनांमुळं बंद झाल्या
संपूर्ण जगावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र सावध राहणं गरजेचं आहे. नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. सामाजिक, आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. ते सुरू करावे लागतील. हे समाजाचं नवीन रूप आहे. या नव्या परिस्थितीनं आपल्याला अनेक अनुभव दिले आहेत. अनेक कृत्रिम गोष्टी कोरोनामुळं बंद झाल्या. याचं काही नुकसान नाही. कोरोनामुळं अनेकांचे रोजगार गेले आहेत. रोजगार सोडून गावी गेलेले मजूर आता परतत आहेत. परतलेल्यांना रोजगार आहेच असं नाही. त्यांना रोजगार शोधावा लागेल. कोरोनाला हरवण्याचा संकल्प करा, असं मोहन भागवत म्हणाले.
























































