
>> द्वारकानाथ संझगिरी
विश्वचषक 2019 च्या गुणांच्या स्टॉक मार्केटमध्ये हिंदुस्थानी संघ टॉपचा ब्लू चिप शेअर ठरला. ती जागा ऑस्ट्रेलियाची आहे असं कालपर्यंत अनेकांना वाटत होतं, पण क्रिकेट हा विचित्र खेळ आहे. गोड बोलता बोलता कधी दगा देईल सांगता येत नाही. दक्षिण आफ्रिकेला ओव्हरटेक करताना ऑस्ट्रेलियाला अपघात झाला. या विश्वचषकातल्या फॉर्मचा विचार केला तर मोटरसायकलने टँकर उडवला असं म्हणावं लागेल. चला, दक्षिण आफ्रिकेला घरी परतताना काही चांगल्या आठवणी बॅगेत भरायला मिळाल्या. नाहीतर अपयशाशिवाय त्यांच्या बॅगेत होतं काय? त्याचा फायदा हिंदुस्थानी संघाला झाला. आता हिंदुस्थानी संघ एजबॅस्टनला इंग्लंडऐवजी मॅन्चेस्टरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळणार. दगडापेक्षा वीट मऊ! चुकलो चुकलो! क्रिकेटमध्ये मऊ वीट कधी निष्ठेवर दगड होईल हे सांगता येत नाही.
हिंदुस्थानी संघाने लिडस्वर श्रीलंकेला टिचकी मारून दूर सारावं तसं सारलं. धक्का द्यायचीसुद्धा गरज पडली नाही. ती टिचकी पुन्हा एकदा रोहित शर्माच्या बॅटने मारली आणि राहुलच्या बॅटने त्याच्या बॅटला हात लावून मम म्हटलं. फ्रांझ काफकाचं एक वाक्य आहे- ‘Anyone who keeps the ability to see beauty never grows old.’ रोहित शर्माने परवा लीडस्वरच्या म्हातार्या कोताऱयांना तरुण केलं. या विश्वचषकात आणखी काही फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. शाकिब उल हसन, वॉर्नर, विल्यमसन वगैरे, पण विश्वचषकातली फलंदाजी ही जागतिक सौंदर्य स्पर्धा असेल तर रोहित शर्माची फलंदाजी मिस वर्ल्ड आहे. वर्ल्डकपमधलं त्याचं पाचवं शतक, त्याचे विक्रम या पुस्तकात पडून राहणार्या गोष्टी आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहेच, पण ते सौंदर्य कुठल्या मोजपट्टीने जोखायचे? एकदा अजित वाडेकरच्या फलंदाजीचे वर्णन इंग्लंडमधल्या एका पत्रकाराने ‘Relaxed Silkiness’ असं केलं होतं. ते वर्णन रोहितच्या फलंदाजीला चपखल बसते. मलिंगासकट श्रीलंकेच्या एकाही गोलंदाजाकडे त्याच्या धावांचा ओघ थांबवायची ताकद नव्हती. त्यांचा प्रत्येक बांध त्या फटक्यांच्या ओघापुढे कोसळून पडत होता. कुठे कुठे बांध घालणार? मंतरलेल्या कव्हर ड्राईव्हपासून पूल, कट, ग्लान्स करत त्याने अख्खं मैदान व्यापून टाकलं. तो ओघ थांबवायला श्रीलंकेला बावीस क्षेत्ररक्षकही पुरले नसते. एकेकाळी आपल्या विजय मांजरेकरांनी मला सांगितलं होतं, ‘तू पीटर मे पाहिला नाहीस म्हणजे तू फलंदाजीच पाहिली नाही.’ आज पीटर मे असते तर ते म्हणाले असते, ‘तुम्ही रोहित शर्मा पाहिला नाहीत. म्हणजे तुम्ही फलंदाजीतलं सौंदर्य पाहिलं नाहीत.’ रोहित शर्माच्या हातात त्याच्या फलंदाजीचे सर्व अधिकार होते. अगदी बाद होण्याचेसुद्धा! शतक झाल्यानंतर त्याने तो अधिकार वापरला. एकेकाळी तो शतक झाल्यावर मोठं शतक करायचा. आता शतकानंतर तो ढेकर देतो. पत्रकार परिषदेत त्याने त्याची कबुली दिली.
रोहितच्या खेळीच्या सावलीत राहुलची खेळीही बहरली. यावेळी शतकाचा रस्ता तो चुकला नाही. रस्ता सापडायला तसा सोपा होता. वाटेत चकव्याची शक्यता नव्हती, पण पूर्वी अनेकदा सोप्या रस्त्यावरही त्याला ठेच लागलीय. राहुलचे फटके रोहितच्या फटक्यांमुळे झाकले नाही गेले. ‘दिवार’मध्ये अमिताभ बच्चनसमोर ज्या खंबीरपणे शशी कपूर उभा राहतो त्या खंबीरपणे राहुल, रोहितसमोर उभा राहिला. काही कव्हर ड्राईव्हज् आणि पूलच्या वेळी राहुलचा की रोहितचा संभ्रम निर्माण झाला. दोघांच्या शतकांमुळे मधल्या फळीला पेड हॉलिडे मिळाला.
टगोलंदाजीतला हिरो पुन्हा जसप्रीत बुमरा होता. बुमराने चांगली गोलंदाजी टाकली ही आता बातमी राहिलेली नाही. आंघोळ, खाणं, झोपणं इतकी ती गोष्ट त्याच्या अंगवळणी पडलीय. मला परवा कुणीतरी म्हटलं, ‘बुमराला विश्रांती का नाही दिली?’ ‘मग मॅच कोण जिंकून देणार’, मी विचारले. त्याची ऍक्शन अशी आहे की, त्याच्या शरीरावर त्याचा थोडा परिणाम होत असणार, पण फॉर्मात असलेल्या गोलंदाजाला विश्रांती घ्यायला आवडत नाही. भुवनेश्वर हासुद्धा चांगला गोलंदाज आहे, पण त्याच्या परफॉर्मन्समध्ये सातत्य कुठाय? परवा तर त्याचा दिवसच नव्हता. त्याचा टप्पा भरकटला होता. बुमरा धावा देत नाही म्हटल्यावर इतर दरवाजे ठोठावले जातात. त्यात भुवनेश्वरचा दरवाजा श्रीलंकन फलंदाजांना उघडा सापडला. त्याने मॅथ्यूजचा झेलही सोडला. काही वेळा त्याच्या हातून चेंडू नीट अडवले गेले नाहीत. पटकन विसरावा असा हा भुवनेश्वरसाठी दिवस होता. तोच दिवस किती वेगवेगळी नशिबं घडवतो. गदिमांनी लिहिलंय – ‘कुणा मुखी पडते लोणी, कुणा मुखी अंगार’ ते खोटे नाही. रोहित-राहुलचं तोंड लोण्याने भरलं. भुवनेश्वरकुमारच्या वाटणीला अंगार आला. पण रवींद्र जाडेजाने त्याला मिळालेल्या संधीचा फायदा उठवला. त्याची पहिली सात षटकं तर इतकी अचूक होती की, त्याने त्यात एकही धाव दिली नाही. नंतर फलंदाज सेट झाल्यावर त्याला भिडायला पुढे सरसावले. त्यावेळी आखूड टप्प्याचे चेंडू टाकणे ही त्याची नैसर्गिक प्रतिक्रिया होती, पण माझा अंतिम सामन्यासाठी विचार करा असे त्याची गोलंदाजी ओरडून सांगत होती. ते रवी – विराटने ऐकलं असावं असं आपण गृहीत धरूया. कारण कुलदीपला यावेळी पूर्वीसारखं यश मिळालेलं नाही. त्याचा तो ‘शतकातला चेंडू’ सोडला तर त्याला या दौर्यावर मौल्यवान असं काही सापडलेलं नाही. गोष्टीचे पुस्तक वाचावे तशी त्याची गोलंदाजी वाचली जाते. अगदी स्वल्पविराम, पूर्ण विरामासह. त्याच्या गोलंदाजीतला सस्पेन्स आता संपलाय. यश काही वेळा उणिवांवर पांघरुण घालते तसं होऊ नये. उणिवांवर आता विचार करावा. कारण इथून पुढे सावरायला संधी नाही. तोल गेला की संपलं.
आज लीडस् सोडताना खूप मन भरून आलंय. यॉर्कशायर आणि यॉर्कशायचे खेळाडू हा माझा लहानपणापासूनचा जिव्हाळय़ाचा विषय. 1952 साली याच मैदानावर हिंदुस्थानी संघाची अवस्था एका कसोटी सामन्यात 4 बाद 0 अशी झाली होती. त्यानंतर कर्णधार विजय हजारे आले आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवर कव्हर ड्राईव्ह मारून हिंदुस्थानी संघाचे खाते उघडलं. या गोष्टीची खिल्ली अनेकदा इंग्लिश खेळाडूंकडून उडवली गेली. 1986 साली याच मैदानावर हिंदुस्थाने इंग्लंडचा तीन दिवस आणि एका चेंडूनंतर पराभव केला, तेव्हा मला झालेल्या आनंदाचं मी वर्णन करू शकत नाही. दिलीप वेंगसरकरने चेंडू वेडावाकडा हलणार्या वातावरणात एक अजरामर शतक ठोकलं. त्या संध्याकाळी सर लेन हटन या महान फलंदाजाने मला चक्क वाईन पाजली आणि कौतुकाने तो हिंदुस्थानी क्रिकेटपटूंबद्दल बोलत हाता. हाच हटन 1952 साली इंग्लंडचा कर्णधार होता.
त्याने स्वर्गातून रोहित-राहुलची फलंदाजी पाहिली असेल. निव्वळ आत्मविश्वासाच्या बाबतीत हिंदुस्थानी फलंदाजी कुठे पोहोचलीय हे पाहिले असेल. त्याला आनंद झाला असेल.
काल शॅम्पेनचा ग्लास मी हटनसाठी उंचावला. त्याच्या अदृश्य ग्लासला तो भिडला असावा. ती होतीच ‘शॅम्पेन खेळी’.






























































