‘फिनिक्स’ने बाळसं धरल्याचा आनंद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

वेस्ट इंडीजने पाकिस्तानला विश्वचषकाच्या दुसऱया सामन्यात चिरडून टाकलं. मला प्रचंड आनंद झाला. हा आनंद पाकिस्तानला चिरडण्याचा होता, पण त्यापेक्षा जास्त वेस्ट इंडीजच्या फिनिक्स पक्ष्याने बाळसं धरल्याचा होता आणि चिरडणं किती निर्घृण होतं. 35 षटकांत मॅचच संपली.

20 वर्षांपूर्वी मला कुणी विचारलं असतं की, हिंदुस्थाननंतर तुझा आवडता संघ कुठला? तर अर्ध्या बेशुद्धीत पण मी वेस्ट इंडीज म्हणून सांगितलं असतं. अरे, वेस्ट इंडीज आमच्या पिढीसाठी क्रिकेटचं हॉलीवूड होतं. आमचे सर्व हीरो हे वेस्ट इंडियन होते. वॉरेल, सोबर्स, कन्हाय, हॉल, रिचर्डस्, मार्शल, रॉबर्टस्पासून लारापर्यंत. सोबर्स त्याचा पार्श्वभाग मागे घेऊन कॉलर वर काढून चालतो म्हणून मी तसा चालायचा प्रयत्न करायचो. इतका सोबर्स, इतकं वेस्ट इंडियन क्रिकेट अंगात भिनलं होतं. बघता बघता वेस्ट इंडियन क्रिकेटची काँग्रेस झाली, प्रचंड पडझड! ते आक्रमक फलंदाज लुप्त झाले. ‘चेंडू हा ठोकण्यासाठी असतो, अगदीच अशक्य असेल तेव्हाच बचाव करायचा’ ही वृत्ती कुठे तरी संपल्यासारखी वाटली. ते वेगात उसळणारे चेंडू भूतकाळात हरवले. मुख्य म्हणजे कुणीही जाऊन वेस्ट इंडीजला वेस्ट इंडीजमध्ये उताणे करायला लागले.

वेस्ट इंडियन मुलं बास्केटबॉलकडे वळली. टी-20 आलं. आयपीएल आलं आणि वेस्ट इंडीज क्रिकेट पुनर्जीवित झालं. ते कसोटी क्रिकेटचे दादा झाले नाहीत, पण जगभर टी-20 लीग त्यांचे क्रिकेटपटू गाजवायला लागले. त्यांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागला. पुन्हा उंच उंच फटके, हरवणारे चेंडू दिसायला लागले आणि हळूहळू गोलंदाजीतला वेस्ट इंडियन वेग आणि आक्रमकता दिसायला लागली. त्याचा चांगला परिणाम त्यांच्या वन डेच्या खेळावर झाला. शेवटी वन डे हे टी-20चं थोरलं भावंडच. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ती ताकद दिसली. पाकिस्तानी फलंदाजांना कॉटरेल, रसेल, थॉमसने चक्क उसळत्या चेंडूने हादरवून सोडले. वेगवान, उसळत्या चेंडूवर फटके खेळताना फलंदाजाचे रिफ्लेक्सेस चांगले असावे लागतात. पाकिस्तानी फलंदाज त्या उसळीपुढे कोसळले आणि मग गेलने 50 धावांची खेळी करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले. हे गोलंदाज कुणी नामवंत नाहीत. त्यांची नावं हॉल, मार्शल, गार्नर, होल्डिंगएवढी मोठी नाहीत, पण त्यांच्यात कच्ची गुणवत्ता मोठी आहे. ती अनुभवातून परिपक्व झाली तर निदान त्या जुन्या हॉलीवूडच्या दिवसांच्या आठवणी जाग्या होतील. फलंदाजाकडे चेंडूची ‘शकलं’ करायची ताकद आहेच. या मॅचनंतर या विश्वचषकात वेस्ट इंडीजला कुणीही कमी लेखणार नाही.

पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडसाठी ‘इंग्लिश ब्रेकफास्ट’ ठरला. इंग्लिश ब्रेकफास्ट हा युरोपियन ब्रेकफास्टपेक्षा जास्त वैविध्यपूर्ण असतो. दक्षिण आफ्रिकेला 104 धावांनी हरवणं हा पोटभर ब्रेकफास्ट झाला. इंग्लिश संघ सध्या बकासुर वाटतोय.

हा विश्वचषक जिंकण्याचं हिंदुस्थानी स्वप्न उद्ध्वस्त करण्याची ताकद इंग्लंडकडे आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इंग्लिश संघाला ही ताकद त्यांच्या फलंदाजी-गोलंदाजीतल्या समतोलाने दिली आहे. क्षेत्ररक्षणही त्यांनी असं केलं की बेन स्टोकसारखा खेळाडू जिम्नॅस्टिक्समधली आपली कारकीर्द सोडून क्रिकेटमध्ये आलाय असं वाटावं. त्याने रशिदच्या गोलंदाजीवर तो काय झेल घेतलाय? त्या फटक्यावर षटकार असं स्पष्टपणे लिहिलेलं होतं. स्टोक्सने त्यावरची ‘षटकार’ ही अक्षरं पुसून टाकून त्यावर ‘झेल’ अशी अक्षरं कोरली. असे झेल हातात बसतात, पण त्यासाठी प्रयत्न हा महत्त्वाचा असतो. उडीचं टायमिंग अचूक लागतं. आपल्याकडचे बुवा भगवे कपडे घालून हवेतून उदी काढतात. त्याने निळे कपडे घालून हवेतून चेंडू काढला.

अर्थात तो बेन स्टोक्सचा दिवस होता. धावा काय, झेल काय, विकेटस् काय! त्याने अष्टपैलू कुणाला म्हणायचं हे समजावलं.

इंग्लंडची फलंदाजी स्फोटक आहे. वरच्या फळीतले जेसन रॉय, जॉन बेअस्ट्रो, बटलर हे बुलडोझर आहेत. बेअस्ट्रो पहिल्या चेंडूवर बाद होऊनही इंग्लंडच्या फलंदाजीच्या ऍप्रॉचमध्ये काडीचा फरक पडला नाही. जो रूट हा तंत्रशुद्धतेवर सौंदर्याचे अलंकार चढवलेला फलंदाज आहे. कर्णधार इयॉन मॉर्गन हा आयरिश रक्ताचा असल्यामुळे त्याच्या रक्तातली बंडखोरी आणि आक्रमकता त्याच्या फलंदाजीत दिसते. त्याला इंग्लंड संघाचा कर्णधार करणं हा आयर्लंडने इंग्लंडचा केलेला नैतिक पराभवच आहे. बेन स्टोक्स आणि मोईन अली हे अस्सल अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यानंतरही खरं तर त्यांच्या फलंदाजीला तळ नाहीच आहे. मुख्य म्हणजे शेपूट हे वाढवलेलं धड आहे आणि ते उत्तुंग फटके मारू शकतं.

गोलंदाजीत त्यांच्याकडे वेग आहे, स्पिन आहे. सध्या लेगस्पिनर्स किंवा मनगटाने चेंडू वळवणारे फिरकी गोलंदाज वन डेची आभूषणं ठरतायत. त्यांचा आदिल रशिद हा त्यातलं एक किमती आभूषण आहे. मुख्य म्हणजे त्यांना एक नवा झंझावात मिळालाय त्याचं नाव आहे जोफ्री आर्चर! हा मुलगा आहे ब्रिटिश बापाचा. ब्रिटिश पासपोर्ट त्याच्याकडे आहे. त्याची आई वेस्ट इंडियन. तो आतापर्यंत खेळला वेस्ट इंडीजमध्ये, पण त्याला खेळायची इच्छा होती इंग्लंडसाठी. पण त्यांचा निर्णय असा की सात वर्षे इंग्लंडमध्ये खेळल्याशिवाय इंग्लंडसाठी खेळता येत नव्हतं. इंग्लंडने नियम बदलला. फ्लिंटॉप म्हणाला, ‘इंग्लंड टीममधून कुणालाही काढा, पण आर्चरला घ्या.’ त्याचं ऐकलं गेलं. राजस्थान रॉयल्सने आठ कोटी देऊन विकत घेतलेल्या आर्चरने फ्लिंटॉपचा विश्वास सार्थ ठरवला. त्याच्याकडे वेस्ट इंडियन वेग आणि आक्रमकता आहे. इंग्लिश संघ आता इंग्लंडप्रमाणे कॉस्मोपॉलिटन झाला आहे.
[email protected]