आता लक्ष्य पाकिस्तान

द्वारकानाथ संझगिरी

‘पावसाच्या संततधारेमध्ये ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान मॅचने अडथळा निर्माण केला.’ इंग्लंडमधल्या मॅथ्यू एंजल्स या लेखकाने त्याच्या खास तिरक्या शैलीत लिहिलं होतं. टिपिकल इंग्लिश खवचटपणा याला म्हणतात. चार सामने वाहून जात असताना चक्क ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामना झाला त्याबद्दल ही त्याची टिप्पणी होती, पण सुदैवाने आता पावसाचं आक्रमण कमी होतंय. गुरुवारी संध्याकाळी मी नॉटिंगहॅमला मॅच न झाल्याचं दुःख ‘रोझे’ नावाच्या गुलाबी गालाच्या वारुणीसह विसरण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी दुःख विसरायचा तोच मार्ग अवलंबला होता. इंग्लंडमधले पब्ज त्यासाठीच तर आहेत, पण लंडनला परतायला ट्रेनमध्ये बसलो आणि खिजवायला सूर्य ढगातून बाहेर आला. तो सूर्य, ‘कशी जिरवली’ म्हणत खदाखदा विकटपणे हसतोय असं मला वाटलं. त्याने थोडं आधी दर्शन दिलं असतं तर थोडीफार मॅच तरी झाली असती. पण मागे वळून पाहताना वाटतं की, कमी षटकांचा सामना होण्यापेक्षा न झालेला बरा. मॅचमध्ये एकदा टॉस महत्त्वाचा झाला की, नशिबाचा भाग फार महत्त्वाचा ठरतो.

त्यात न्यूझीलंडकडे इंग्लिश वातावरणासाठी उत्तम गोलंदाज आहेत. ओल्या आऊटफिल्डवर क्षेत्ररक्षण करताना किंवा किंचित ओलसर खेळपट्टीवर फलंदाजी करताना खेळाडू जखमी व्हायची शक्यता असते. एक अधिक गुण मिळण्यासाठी आणखी काही ‘अंगठय़ांचं’ बलिदान का द्यावं? हिंदुस्थानी संघात आत्मविश्वास आता ओसंडून वाहतोय. फलंदाजीतल्या दोन-चार जखमांनी त्यावर परिणाम होणं योग्य नव्हतं.

आता एकच लक्ष्य-पाकिस्तान! पाकिस्तानी संघाची कामगिरी समुद्राच्या भरती-ओहोटीसारखी आहे. ओहोटीनंतर लगेच भरती येते आणि भरतीनंतर ओहोटी. वेस्ट इंडीजने त्यांना उसळत्या चेंडूंवर लोळवलं. त्याच पाकिस्तानी संघाने इंग्लंडचे उसळते चेंडू सीमापार पाठवले. इंग्लंडच्या डावपेचासाठी ते मानसिकदृष्टय़ा तयार होते आणि ‘सर पे कफन बांधून’ ते मारत गेले. त्या दिवशी ‘कफन’ची गरज इंग्लिश गोलंदाजीला पडली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना त्यांनी पुन्हा उसळत्या चेंडूंवर विकेट दिल्या. पण ‘ब्लो हॉट ब्लो कोल्ड’ ही त्यांची शैली सुरूच राहिली. ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता 22 षटकांत 146 धावांची घोडदौड केली. त्यापुढे इथल्या वेगवान ट्रेन्सचा वेगही कमी वाटला. त्यांच्या चारशे धावासुद्धा शक्य वाटायला लागल्या. पण पाकिस्तानने नंतर त्यांचे दहा बळी 161 धावांत घेतले. किंबहुना ऑस्ट्रेलियाने 49 षटकांत ‘राम’, सॉरी ‘जिजस’ म्हटलं. मॅचनंतर डेव्हिड वॉर्नरने कबूलही केलं की, पाकिस्तानी गोलंदाजांचे दुसरे स्पेल अप्रतिम होते. महंमद आमीरकडे तर ऑस्ट्रेलियन बॅट धावांची माधुकरी मागत होती. त्याने 30 धावांत पाच बळी घेतले. या विश्वचषकात त्याची या पराक्रमाची बरोबरी कुणी केलेली नाही. ओलसर खेळपट्टीवर त्याने योग्य टप्पा ठेवला आणि पुढे खेळपट्टी आणि वातावरणाने त्याच्या चेंडूची पालखी वाहिली.

पाकिस्तानने 2 बाद 136 पर्यंत मजल मारली तेव्हा माझ्या हृदयाचा एक ठोका हरवला. टाँटनच्या मैदानावर समोरच्या सीमारेषा छोटय़ा आहेत. मला एक जुना किस्सा आठवतो. 1986 साली समरसेंटविरुद्ध खेळताना सुनील गावसकर फॉर्मात बॅटिंग करीत होता. शतकाजवळ आल्यावर सुनीलने समोर षटकार मारण्याचे प्रयत्न केले. मला आश्चर्य वाटलं. सुनीलच्या बॅटच्या स्वभावाविरुद्ध होतं ते! संध्याकाळी मी सुनीलला विचारलं, ‘शतकाजवळ आल्यावर तू वरतून का मारत होतास?’ तो म्हणाला, ‘मी माझं शतक कधी षटकार मारून पूर्ण केलेलं नाही तो प्रयत्न करीत होतो, पण चेंडू किंचित आत पडून चौकार गेला.’’ त्यावेळच्या बॅट वेगळय़ा होत्या. विचारधारा वेगळी होती. टी-20 वृत्ती अस्तित्वात नव्हती. आता ते सोपं झालंय. त्यामुळे पाकिस्तानला तिथून जिंकायची संधी होती. पण ते पुन्हा कोसळले. ‘चला संपलं’ म्हणून पाकिस्तानी संघाच्या नावाने आंघोळ करून येईपर्यंत हसन आणि वहाबने टेक ऑफ घेतला. ऑस्ट्रेलियाकडे मायकेल स्टार्कसारखी ऍण्टी एअरक्राफ्ट गन आहे. म्हणून उडणाऱया पाकिस्तानचे पंख छाटले गेले. पण यातून एक गोष्ट ओळखायची की, पाकिस्तानी संघ कधी कोसळणारा धबधबा असतो तर कधी उसळणारं कारंजं. त्यामुळे आपल्याला डोळय़ात तेल घालून धबधबा कोसळत असताना पुन्हा कारंजं उसळणार नाही हे पाहायला हवं.

निखळ कागदावर हिंदुस्थानी संघ ताकदवान आहेच आहे. पण पाकिस्तानविरुद्ध कागदावरची ताकद मैदानावर उतरवताना लोखंडाचे चणे खायची मानसिक तयारी ठेवून नसा लोखंडाच्या करून आणि मेंदू बर्फात ठेवून खेळायला लागतं. गेल्या वर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आठवणी अजून इथल्या स्ट्रॉबेरीसारख्या ताज्या आहेत. त्या मनावरून पुसल्या जातील, पण त्यांचा मँचेस्टरवर पराभव केल्यावरच. अचानक त्यांची फलंदाजी ‘गोलिएथ’सारखी ताकदवान झाली आणि आपल्या फलंदाजीतले ‘डेव्हिड’ नाममात्र ठरले. आमीरच्या एका दर्जेदार स्पेलमध्ये संघातले काही डेव्हिड पालापाचोळा होऊन पॅव्हेलियनमध्ये उडून गेले होते आणि मग पांडय़ाची 43 चेंडूंमधली 76 धावांची वादळी खेळी फक्त जखमेवर एक फुंकर मारून गेली. पण फुंकर मारून जखम बरी होत नाही. त्यावर खपली धरावी लागते. ती खपली उद्या ओल्ड टॅफोर्डवर पाकिस्तानला हरवूनच धरणार आहे. तो महंमद आमीर आता पुन्हा फॉर्मात आहे. तो मॅचफिक्सिंगच्या वावटळीत सापडला नसता तर काही वर्षांत त्याचं रूपांतर नव्या वासीम अक्रममध्ये झालं असतं. इंग्लंडचं वातावरण हे त्याच्या गोलंदाजीसाठी नंदनवन आहे. मिचेल स्टार्कच्या बाबतीत जो धडा हिंदुस्थानी आघाडीच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना गिरवला तो महंमद आमीरसमोर खेळताना गिरवायला हवा. शिवाजी महाराजांप्रमाणे गरज पडली तर ‘तह’, मग हल्ला! कारण वेगवान, पण गोलंदाजीत सातत्य नसलेला वहाब सोडला तर पाकिस्तानी गोलंदाजी सामान्य आहे. त्यामुळे सेट झाल्यावर चरायला कुरण आहे.

जसप्रीत बुमरालासुद्धा एक हिशेब चुकवायचा आहे. त्या सामन्यात बुमराकडून नऊ षटकांत पाकिस्तान्यांनी 68 धावा लुटल्या होत्या. त्याला एकही विकेट मिळाली नव्हती. बुमराने ती क्वचित घेतलेली ‘सुट्टी’ होती. गेल्या वर्षभरातला बुमरा वेगळा आहे. परवाच एक अनोखी आकडेवारी मला वाचायला मिळाली. 2015 च्या विश्वचषकानंतर कुणी किती फलंदाजांना ‘बिट’ केलं याची! त्यात बुमराची सरासरी सर्वाधिक म्हणजे 16.80 आहे. त्यानंतर स्टार्क येतो. मग वहाब, मिस्तफिजुर, रबाडा वगैरे! याचा अर्थ प्रत्येक षटकात बुमरा एकदा तरी फलंदाजाला बिट करतो. आणखी एक आकडेवारी पाहा. या विश्वचषकात योग्य टप्प्यावर चेंडू टाकण्यामध्ये सरासरीत बुमरा दुसरा आहे. 71.1 टक्के अशी त्याची सरासरी आहे. त्याच्यापुढे न्यूझीलंडचा फर्ग्युसन 73.2 टक्क्यांवर आहे. कमिन्स, बोल्ट त्यानंतर येतात. ‘क्रिकव्हिज’ने आणखी एक वेगळी सरासरी दिलीय. ‘गोलंदाजीवर चुकीचे फटके (Falsu Shots)मारले जाण्याची सरासरी! त्यात पुन्हा बुमरा 32.2 सरासरीने दुसरा आहे. त्याच्या डोक्यावर फक्त दक्षिण आफ्रिकेचा मॉरिस आहे.

तर अशा बुमराने पाकिस्तानचा मागचा हिशेब चुकवण्यासाठी चाणक्याप्रमाणे शेंडीला नक्की गाठ मारली असेल. नाहीतरी सध्या चाणक्याचेच दिवस आहेत.

dsanzgiri@hotmail.com