खाणं आणि गाणं

70

अतुल दाते. वडिलांचा सांगितिक वारसा निष्ठेने पुढे नेत आहेत. गाण्याइतकेच त्यांचे खाण्यावरही प्रेम.

खाणं या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – चांगलं खाणं आणि चांगलं गाणं मला आवर्जून कळतं. जेवण बनवणं ही एक कला आहे असं मला वाटतं. म्हणून आमची घरची मंडळी गाण्याबरोबर खाण्यालाही तेवढाच मान देतात. एखादा गवय्या रियाज करून गातो आणि एखादी गृहिणी स्वयंपाक बनवते या दोन्ही कला सारख्याच आहेत.

खायला काय आवडतं? – शाकाहारी, मांसाहारी दोन्ही आवडतं. कारण माझी आई सीकेपी होती. वडील कोकणस्थ ब्राह्मण. त्यामुळे ज्या दिवशी मासे खायची इच्छा असेल तेव्हा मी सीकेपी असतो. ज्या दिवशी आमटी भात खायची इच्छा असेल तेव्हा मी ब्राह्मण असतो. माझी आजी, आई आणि बायको प्रचंड सुगरण. मी स्वतःला लकी समजतो. माझ्या तीन्ही पिढय़ांकडून मला अप्रतिम खायला मिळालं. पनीर खुप आवडतं. सगळ्या प्रकारचे मासे आवडतात. गोड सध्या कमी खातो तरीही आवडतं. रसमलाई, खीर, फिरनी (मुसलमानी पदार्थ) हे आवडीचे पदार्थ.

आठवडय़ातून बाहेर खाणं किती वेळा होतं? – पंधरा दिवसातून एकदा होतं. शक्यतो घरचं जेवतो. कामानिमित्त बाहेर असलो तर डबा घेऊन जातो.

हॉटेलमध्ये कोणत्या आवडतं जायला? – जिप्सी हे माझं अत्यंत आवडतं हॉटेल आहे.

दौऱयावेळी आवडलेला वैशिष्टय़पूर्ण पदार्थ? – दुबईला आणि अमेरिकेत जेव्हा समोर पुरणपोळी येते. तेव्हा आश्चर्याचा धक्का बसतो. असा प्रसंग माझ्याबाबतीत घडला.

स्ट्रिट फूड आवडतं का? – हो, पाणीपुरी प्रचंड आवडते.

घरी केलेल्या स्वयंपाकात काय आवडतं? – कारलं सोडलं तर सगळंच आवडतं.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खाऊ घालता? – पाहुणे काय खाणार त्यावर अवलंबून आहे. मासे खाणारे असतील तर ते मी स्वत; आणतो. साफ करतो. बनवतो. महिन्याचं सामान, आठवडय़ाची भाजी मी स्वतः आणतो.

पनीर चटपटा
पनीर घ्यायचं. किचिंतसं तेल तव्यावर सोडून ते त्यामध्ये लाल करून घ्यायचं. ते एका भांडय़ात काढून ठेवायचं. त्यानंतर थोडय़ाशा बटरमध्ये जिरे, हळद, तिखट, कसुरी मेथी हे घालायचं. त्यामध्ये लाल केलेलं पनीर टाकायचं. वरून किंचितसा चाट मसाला घालून परतायचं. चवीला ही रेसिपी अप्रतिम लागते.

आपली प्रतिक्रिया द्या