सौरभ गोखलेसोबत खिचडी Date

>> शेफ विष्णू मनोहर

अभिनेता सौरभ गोखले फिटनेसच्या बाबतीत अति जागरुक. त्यामुळे प्रथिनयुक्त मांसाहार त्याला विशेष प्रिय… पण त्याच्या हातची साबुदाणा खिचडी निव्वळ अप्रतिम…

सौरभ गोखल एक हरहुन्नरी कलाकार, जवळपास त्याची माझी ओळख पहिल्यांदा 8-10 वर्षांपूर्वी झाली असावी ती सुद्धा मेजवानीच्या सेटवर. तस पाहिलं बऱयाच नामवंत कलाकारांसोबत माझी पहिली ओळख ही कुकरी शोच्या निमित्ताने सेटवरच झाली आहे, सौरभ मराठी माfिलका, नाटकं करता-करता स्वतःच्या मेहनतीने हिंदी चित्रपटातसुद्धा झळकला. नुकत्याच आलेल्या अजय देवगण याच्या ’सिम्बा’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावली होती.

फुलोरा मधील सगळे लेख त्याला आवडतात आणि मला सुद्धा तुमच्या बरोबर लंच डेटवर जायला आवडेल असं म्हटल्याबरोबर मी लगेच होकार दिला आणि तो म्हणाला इकडे तिकडे न जाता तुम्ही माझ्या घरीच या! त्याचं घर पिंपरी-चिंचवड भागात आहे आणि नुकतीच तिथे ’विष्णूजी की रसोई’ सुरु झाल्यामूळे माझं जाणं येणं बरचं होतं. एक दिवस ठरवून आम्ही त्याच्या घरी भेटण्याचं ठरवलं. त्यादिवशी नेमका उपवास असल्यामुळे सौरभ म्हणाला मला साबुदाणा खिचडी उत्तम करता येते. मी सुद्धा आनंदाने होकार दिला कारण साबुदाणा खिचडी माझा वीक पॉईंट आहे. भरपूर खिचडी, ताक, साबुदाणा आणि बटाटयाचे पापड असा बेत ठरला. ठरलेल्या वेळी त्याच्या घरी गेल्यावर त्याच्या घरच्या पाच-सहा छोटया-छोटया कुत्र्याच्या पिल्लांनी माझं स्वागत केलं. सौरभ घरसुद्धा सुंदर आहे, भरपूर मोकळी जागा, हिरवागार बगीचा व त्यामध्ये टुमदार असं घर पाहिल्यावर आनंद झाला. गप्पांना सुरु करण्यापूर्वी समोर लस्सी आली, ही लस्सी मी खास तुमच्यासाठी बनवली आहे. त्याची तयारी मात्र मी कालपासून करतो आहे असे तो म्हणाला, अगदी दही लावण्यापासून लस्सीची तयारी केली, याशिवाय मला त्या लस्सीत एक ट्विस्ट दिसला आणि तो म्हणजे लस्सीत त्यांनी भिजवलेला सब्जा घातला होता. त्यामूळे बेसिक पांढऱया लस्सीमध्ये काळा सब्जा उठून दिसतं होता.

खाण्याच्या सवयींबद्दल विचारलं असता तो नॉनव्हेज प्रेमी आहे असं समजलं. सध्या कोणत्यातरी डायटीशीयनच्या सल्ल्यानुसार तो फक्त चिकन आणि भात ऐवढयावरच समाधानी आहे. त्यामुळे त्याच्या वजनात 7 ते 8 किलो वजनाचा फरक पडला आहे असे तो म्हणाला. खाण्याची कितीतरी इच्छा असली तरी सध्या या डायट प्रकरणामूळे मन मारावं लागतं असे तो म्हणतो. स्वयंपाक करायला आवडतं का हा प्रश्न केल्यावर तो म्हणाला आवडतं पण सध्या वेळ कमी असल्यामूळे किचनकडे लक्ष देत नाही. किचनमध्ये इंटरेस्ट घेण्याचं कारण म्हणजे तुम्हीच आहात असं म्हटल्यावर मी त्याला विचारलं कसं काय? तर तो म्हणाला महाराष्ट्राची किचन क्वीन शोधतांना सौरभ ऍकरींग करीत असे, त्यामुळे किचनमध्ये काय-काय गंमती-जमती घडतात हे पाहण्यासारखं आहे. ते बघता बघता मला त्यात गोडी निर्माण झाली. शुटींगमूळे जास्तीत जास्त वेळ घराबाहेर असतो त्यामुळे घरी आल्यावर फावल्या वेळात मी कुकींग या विषयाला प्राधान्य देतो. यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक घेतला आणि तो खिचडी करायला गेला. 10-12 मिनिटानंतर गरमा गरम साबुदाणा खिचडी त्यावर पांढरे शुभ्र ओले खोबरे, कोथिंबीर, सोबत दह्याची वाटी, साबुदाणा पापड आणि भाजलेली मिरची असा बेत समोर आला.

तो स्वतः उत्तम नॉनव्हेज पदार्थ तयार करतो, पण बाहेर खायचं म्हटलं तर पुण्या-मुंबईतील दोन-तीन ठिकाणांबरोबरच नागपूरातील सावजी प्रकार त्याला विशेषत्वाने आवडतो. बाहेर देशात गेल्यावर खाण्याचा काहीच प्रॉब्लेम येतं नाही, कारण वेगवेगळया प्रकारचे मांसाहारी पदार्थ हात जोडून उभे असतात. अमेरिकेत शुटींग दरम्यान एका मॉलमध्ये हा वेळात वेळ काढून जवळपास रोज जायचा, याचं कारण तिथला ’बुचरी’ हा भाग त्याला प्रचंड आवडायचा आणि त्यांच्या बाजुलाच त्यांच लाईव्ह किचन होतं. तुम्हाला जे काय नॉनव्हेज प्रकार आवडत असतील ते तुमच्या पद्धतीने कापून घ्यायचे आणि बाजूला किचनमध्ये जाऊन तिथे उपलब्ध असलेल्या वस्तूंमधून तयार करायचे असा तिथे प्रकार होता. तसाच काहीचा प्रकार हिंदुस्थानातसुद्धा सुरु करायचा आहे, तसेच भविष्यात जमलं तर ’विष्णूजी की रसोई’ सुद्धा सुरु करायला आवडेल असे म्हणतं आमची खिचडी डेट संपली.

चिकन लॉलीपॉप
साहित्य – 8 नग चिकन ड्रमस्टिक , 3 चमचे सोया सॉस, 4 चमचे वाटलेलं लसूण, 1 नग कांदा , अर्धा चमचा मिरपूड, 1 चमचा मीठ, 1 चमचा कस्टरषायर सॉस, 2 नग लाल मिरच्या वाटलेल्या, 1 कप ताज्या ब्रेडचा चुरा, पाव वाटी अक्रोडचा चुरा, अर्धा कप पांढरे तीळ, एक कप मैदा किंवा 1 कप कॉर्नफ्लोअर, 2 अंडयाचा आतील पांढराभाग, 2 चमचे लोणी.

कृती – सोया सॉस, मीठ, मिरची, लसूण-कांदा, कस्टरषायर सॉस हे सर्व एकत्र कालवून त्यात लेग पीसेस सात-आठ तास बुडवून ठेवावेत. (लेग पिसेसला सुरीने चिरा द्याव्यात) आयत्या वेळेला एक-एक पीस उचलून मैद्यात घोळवावा व मग तसाच अंडयाच्या पांढऱया भागात बुडवावा. ब्रेडचा चुरा आणि तिळात घोळवावा व बेकींग ट्रेमध्ये ठेवावा. नंतर त्यावर लोणी टाकून चार-पाच मिनिटं किंवा वरुन सोनेरी, चॉकलेटी रंग येईपर्यंत हे पीस ओव्हनमध्ये भाजावेत.

उपवासाची पनीर खिचडी
साहित्य – 1 वाटी बारीक कापलेले पनीर,अर्धी वाटी दाण्याचे कुट, 3-4 हिरवी मिरची, कोथिंबीर, मिठ, लिंबू, चवीनुसार साखर, तेल.
कृती – फ्रायपॅन मध्ये तेल गरम करुन प्रथम जीरं, हिरवी मिरची, त्यानंतर पनीर टाकून परतून घ्यावे. त्यानंतर त्यात दाण्याचा कुट व उरलेले साहित्य टाकून परतून थोडी वाफ आणून खायला द्यावे.

टीप – हा खिचडी प्रकार शोधण्यामागचं कारण हे की, खिचडी करायचं म्हटलं की साबुदाणा 2-3 तास अगोदर भिजवावा लागतो व तो कधी-कधी चिकट होतो त्यामुळे खिचडी चांगली लागत नाही. याचबरोबर साबुदाण्यापेक्षा पनीर मध्ये कितीतरी पौष्टिक तत्वे आहेत.

manohar.vishnu@gmail.com