‘ईडी’ सरकारची रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात ‘ईडी’ सरकारने रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगप्रकरणी क्लिन चिट दिली आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात दाखल गुन्हय़ाचा तपास बंद करण्यात येत असल्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

नाना पटोले, संजय राऊत, एकनाथ खडसे, बच्चू कडू, संजय काकडे, आशीष देशमुख या राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल झाला होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधिमंडळातही हा मुद्दा प्रचंड गाजला होता आणि तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी याबाबत सविस्तर माहितीही दिली होती.

शिंदे-फडणवीस भेटीनंतर…

शुक्ला केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेल्या. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले आणि ‘ईडी’ सरकार आले. तेव्हा रश्मी शुक्ला यांनी तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत ‘सागर’ बंगल्यावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीनंतरच सूत्रे हलली आणि बंडगार्डन पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दिला.