पेट्रोल, डिझेलनंतर खाद्यतेलांच्या किंमतीत घट, सर्वसामान्यांना दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पेट्रोल डिझेलवरील अबकारी कर हटवल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी झाल्या होत्या. आता आयातशुल्क कमी केल्याने खाद्यतेलांच्या किंमतीही कमी झाल्या आहेत. दिवाळीत खाद्यतेलाच्या किंमती कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने आयातशुल्क कमी केल्याने पामतेल, शेंगदाण्याचे तेल, सोयाबीनचे आणि सुर्यफूल तेलासह अनेक तेलाचे भाव कमी झाल्याची माहिती अन्न व पुरवठा विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने आयातशुल्क कमी केल्याने किरकोळ बाजारात अनेक ठिकाणी खाद्य तेलाच्या किंमती 20, 18, 10 आणि 7 रुपयांनी कमी झाल्या आहेत. देशात बहुतांश ठिकाणी पाम तेल, शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल आणि सोयाबीनच्या बियांचे तेल वापरले जाते. तेल बाजारात त्यांचे प्रमाण 89 टक्के इतके आहे. दिल्लीत शेंगदाणा तेलाची किंमत 7, पाम तेलाची किंमत 7, सोयाबीन तेलाची किंमत 5 तर सुर्यफुल तेलाची किंमत 10 रुपयांनी कमी झाल्याचे पांडे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने कच्च्या तेलांच्या किंमतीवर अडीच टक्के आयात कर कमी केला आहे. तसेच कच्च्या पाम तेलावरील कृषी सेस 20 टक्क्यांहून साडे सात टक्के करण्यात आल आहे. सोयाबीन तेल आणि सुर्यफुलाच्या कच्च्या तेलावरील कृषी सेस पाच टक्के करण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले आहे.

विल्मार आणि रुची इंडस्ट्रीजसह प्रमुख खाद्यतेल कंपन्यांनी घाऊक दर 4 -7 रुपये प्रति लिटरने कमी केले आहेत. सणासुदीच्या काळात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हे दर कमी करण्यात आले आहेत. जेमिनी एडिबल्स अँड फॅट्स इंडिया, हैदराबाद, मोदी नॅचरल्स, दिल्ली, गोकुळ री-फॉइल्स अँड सॉल्व्हेंट, विजय सॉल्व्हेक्स, गोकुळ अॅग्रो रिसोर्सेस आणि एन.के. प्रोटीन्स या आणखी काही कंपन्यांनीही घाऊक दर कमी केले आहेत.