वर्गखोल्यांना गळती; विद्यार्थ्यांना छत्रीचा आधार, शिक्षणमंत्र्यांकडे पालकत्व असलेल्या कोल्हापुरातील स्थिती

नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षणाचा हक्क सांगणाऱ्या कायद्याचा गाजावाजा सर्वत्र होत असताना राज्याच्या शिक्षणमंत्र्यांकडे पालकत्व असलेल्या कोल्हापूर शहरातील पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना वर्ग नसल्याचा प्रकार समोर आला होता. आता ग्रामीण भागातील शाळांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असल्याचे वास्तव समोर आले आहे. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असून, छताच्या गळतीपासून बचाव करण्यासाठी वर्गातच छत्र्यांचा आधार घेऊन अध्ययन करावे लागत आहे. या प्रकारामुळे पालकवर्गातून संताप व्यक्त होत आहे.

सुमारे दोनशेच्या आसपास विद्यार्थीसंख्या असणाऱ्या विद्यामंदिर चक्रेश्वरवाडी शाळेत इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग भरतात. शाळेत भौतिक सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वर्गखोल्यांचे स्लॅब गळतात, मोडक्या खिडक्या आणि खोल्यांचे छप्पर उडाल्याने पावसाच्या धारा थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर बरसतात. त्यामुळे शाळेतील पाच ते सात तास विद्यार्थी थंडीत कुडकुडत अध्ययन करत असल्याचे वास्तव चित्र आहे.

चक्रेश्वरवाडी डोंगरावर वसलेले गाव असल्याने येथे पावसाचे धूमशान सुरू असते. गावातील शाळा डोंगराच्या कडेला असल्याने वादळाचा थेट मारा भिंतीवर होतो. वादळी वाऱ्यामुळे कौलारू शाळांचे कमकुवत झालेले छप्पर उडाल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे. मैदानावर शेतवडीतून पाणी येत असल्याने दलदल आणि निसरडे झाल्याने विद्यार्थी पडून जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सहावी इयत्तेचे वर्ग भरणाऱया षटकोनी खोलीच्या पायाचे दगड निसटले आहेत. छत गळत असल्याने इमारत धोकादायक बनली आहे. अशा भयानक स्थितीत शाळेतील शिक्षक शिकवण्याचे आणि विद्यार्थी शिकण्याचे कर्तव्य बजावत आहेत. वर्गखोल्यांना गळती लागल्यामुळे विद्यार्थ्यांना छत्रीचा आधार घेऊन अध्ययन करावे लागत आहे. या सर्व भयानक परिस्थितीकडे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीसह शिक्षण विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांची ही दयनीय अवस्था पाहिल्यानंतर मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याचे उल्लंघन नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

440 व्होल्टेजच्या लाइनची भीती

शाळेच्या मैदानाजवळून 440 व्होल्टेजची विद्युत लाइन गेली आहे. येथील झाडे आणि लाइनचा स्पर्श होत असल्यामुळे शॉर्ट सर्किटची भीती व्यक्त केली जात आहे. वर्गखोल्यांच्या भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने विजेचे सर्वच स्विच भिजले आहेत. त्यांना विद्यार्थ्यांनी स्पर्श केल्यास दुर्घटना घडण्याची भीती आहे.