
सामना प्रतिनिधी, मुंबई
शाळांच्या गुणवत्ता विकासासाठी आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या सक्षमीकरणासाठी यंदाही शालेय शिक्षण विभागाने ‘शिक्षणाची वारी’चे आयोजन केले आहे. येत्या 28 नोव्हेंबरपासून मुंबईतील वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानात या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या वारीत शिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोग पाहण्याची संधी मिळणार आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधित्व पालकांकडे आहे. त्यामुळे व्यवस्थापन समिती सक्षम झाल्यास शाळेच्या विकासात पालकांचा सहभाग वाढेल. याचा फायदा विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यात होईल. हा उद्देश यंदाच्या शिक्षणाच्या वारीचा आहे. वारीचे यंदाचे चौथे वर्ष असून यावेळी मुंबईसह कोल्हापूर, वर्धा, नांदेड आणि जळगाव येथे वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या टप्प्यातील पहिली वारी मुंबईत होणार असून या वारीला रायगड, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यांतील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षक भेट देणार आहेत. दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व शिक्षणप्रेमींसाठी वारी खुली असणार आहे.
शिक्षण वारीत काय पहाल?
शाळा विकास आराखडा व शाळा व्यवस्थापन समिती संरचना, पालकांची शाळांना अध्यापनात/कौशल्य विकासात मदत, किशोरवयीन आरोग्य शिक्षण, पटसंख्या वाढीचे उपाय, लोकसहभाग, शालेय पोषण आहार, स्थलांतरित व शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी समितीचा सहभाग, दिव्यांग मुलांसाठीचे शिक्षण, गणित व भाषा वाचन विकास, कृतियुक्त विज्ञान, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, कला, कार्यानुभव व क्रीडाविषयक उपक्रम.
यंदाच्या वर्षातील दुसरी वारी कोल्हापूर (10 ते 12 डिसेंबर, 2018), तिसरी वारी वर्धा ( 3 ते 6 जानेवारी, 2019), चौथी वारी नांदेड येथे (29 ते 31 जानेवारी, 2019) आणि पाचवी वारी जळगाव येथे (15 ते 17 फेब्रुवारी, 2019) होणार आहे.



























































