
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एकलहेरा येथे फाट्यावर तीन दिवसांपासून किरण खराबे, धनंजय बोरडे, गणेश गाढे, पवन एसलोटे, कृष्णा खोजे, भागवत कळकटे, रामप्रभु आवाढ असे सात मराठा आंदोलक उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाला बसलेल्याची सर्वांची आरोग्य तपासणी केली असता पवन एसलोटे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य हलविले आहे.
मराठा आरक्षणासाठी नांदेड व परभणीतून दोघांची 200 किमी पायी दिंडी
तसेच मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मराठा बांधव पेटून उठले असून ज्याला जमेल तसे आंदोलन करत आहेत. नांदेड जिल्ह्यातील चोंडी ता. लोहा येथील मराठा सेवक नवनाथ जाधव हे नांदेड ते अंतरवाली सराटी अशी पायी दिंडी काढली आहे. वाटेत त्यांना परभणी जिल्ह्यातील केकर जवळा ता. मानवत येथील सोमेश्वर जगताप यांनी सोबत केली असून आज दुपारी दोघे तीर्थपुरी येथे आले होते. त्यांना तीर्थपुरी येथील मराठा बांधवांनी जेवण दिले. आराम करून ते अंतरवाली सराटीकडे रवाना झाले.
























































