भाजप व्यक्तीपुजक होतोय, वरिष्ठांचा सन्मान नाही; खडसेंनी व्यक्त केली खदखद

eknath-khadse

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दिल्लीत असून तेथे ते भाजप पक्षश्रेष्ठींची भेट घेण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान जे पाडापाडीचे राजकारण झाले याचे पुरावे आपल्याकडे आहे असे खडसे म्हणाले होते आणि हेच पुरावे ते पक्षश्रेष्ठींसमोर ठेवण्याची शक्यता आहे. दिल्लीवारीदरम्यान पत्रकारांशी बोलताना खडसेंनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

भाजपमध्ये वरिष्ठांचा योग्य सन्मान होत नाही अशी भावना तयार होत आहे. पक्ष व्यक्तीपुजक झाला आहे. पक्षापेक्षा एखादी व्यक्ती मोठी हे वातावरण सध्या वाढत असून ते पक्षासाठी घातक आहे, असे एकनाथ खडसे ‘टीव्ही-9’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले. सध्या पक्षातील सांघीक काम कमी होत असून यावर कोणीही बोलायला तयार नाही. तसेच रोहिणी खडसे यांचा पराभव का झाला याची विचारणा करण्यासाठी एकाही वरिष्ठांचा फोन आला नाही, असेही खडसे म्हणाले.

खडसे पुढे म्हणाले की, भाजपमध्ये मी गेल्या 40 ते 42 वर्षापासून कार्यरत आहे. पक्ष विस्तारामध्ये गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, मी, डांगे यांच्यासारख्या अनेकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या वर्षानुवर्ष परिश्रमामुळे आज भाजपकडे बहुजनांचा पक्ष म्हणून पाहिजे जात आहे. पूर्वी भाजपला शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून हिणवले जात होते.

ते पुढे म्हणाले की, ज्यांनी पक्षासाठी, पक्षविस्तारासाठी खस्ता खाल्ल्या अशा लोकांवर काही ठिकाणी अन्याय झाल्याची भावना आहे. मंत्रिमंडळातून बाहेर काढताना जे आरोप केले ते सर्वसामान्यांना न पटणारे होते. हे आरोप चिकटवले गेले आणि त्याच्या चौकश्या करण्यात आल्या. यासह विविध माध्यमातून छळण्याचा जाणिवपूर्वक, हेतूपूर्वकप्रयत्न झाला, असेही खडसे म्हणाले. तसेच मुलीला तिकीट देऊन आपल्याच माणसांकडून हजार-अठराशे मतांनी पराभव करणे, अशा अनेक गोष्टी असल्याचे ते म्हणाले. पक्षातील व्यक्तींकडूनच अशा गोष्टी होत असतील तर मला वेगळा विचार करावा लागेल, असे खडसे पुन्हा म्हणाले.

रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाल्याचा पुनरुच्चार खडसे यांनी केला. तसेच पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक असून याची व्हिडीओ क्लिप, ऑडिओ क्लिप आणि फोटो आहेत. जे सत्य आहे त्यावर कारवाई व्हायला हवी, असेही खडसे यावेळी म्हणाले.

जागा कमी का झाल्या…
2014 ला आम्ही सांघीकपणे, संघटीतरित्या आणि जोमाने काम केले. त्यावेळी सत्ता नव्हती, साधने नव्हती परंतु आम्ही सत्तापरिवर्तन करून दाखवले. तेव्हा युतीमध्ये नाही तर स्वबळावर लढतो तरीही 123 (भाजप 122 आणि महादेव जानकर यांची एक जागा) जागा जिंकून दाखवल्या. मात्र 2019 ला सर्व साधने असताना आणि युतीमध्ये निवडणूक लढवली असतानाही जागा 105 का आल्या याचे चिंतन करणे आवश्यक आहे. काही लोक स्ट्राईकरेट वाढला म्हणत आहेत, परंतु असे असते तर जागा 122 पेक्षा जास्त यायला हव्या होत्या. यासाठी कोण जबाबदार आहे हे मी पक्षापुढे मांडले आहे. असेच सुरू राहिले तर आगामी काळात निवडणुकांसाठी अवघड होईल, असेही खडसे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या