बारसूप्रकरणी गद्दारांनी दिशाभूल केली, उद्धव ठाकरेंनी सांगितली सत्य परिस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केंद्राच्या विनंतीनंतर नाणारच्या ऐवजी बारसूची जागा रिफायनरी प्रकल्पासाठी सुचवली होती. त्यांनी लिहिलेल्या पत्राचं भांडवल करत मिंधे गट आणि भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. याचा उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

रिफायनरीला विरोध करणाऱ्यांशी बारसूत जाऊन चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यामध्ये विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, कोणता प्रकल्प होत असेल आणि त्याचे स्वागत होत असेल तर तो प्रकल्प जरूर व्हावा अशी शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भूमिका आहे . मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्ता जे गद्दार सुपारी घेऊन फिरत आहेत, त्याच गद्दारांनी मला सांगितलं की हा प्रकल्प बारसूला झाला तर हरकत नाही. तिथली बरीचशी जमीन निर्मनुष्य आहे. पर्यावरणाची हानी कमीत कमी होईल. हा प्रकल्प तिथे आला तर आपल्या राज्याला चांगला प्रकल्प मिळेल असे त्यांनी सांगितले होते असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, दुर्दैवाने नुसतं पत्राचं भांडवल केलं जातंय. मात्र केंद्राने या जागेसाठी होकार दिला असता, जो दिलाच; तर माझी एक मांडणी होती की जसा मी आज इथे आलो आहे तसंच मुख्यमंत्री म्हणूनही मी आलो असतो आणि जनतेसमोर प्रकल्पाचं प्रेझेंटेशन देऊन निर्णय घेतला असता. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, माझं प्रकल्पाबाबतचे पत्र नाचवत आहात तर माझ्या काळात आलेले वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, एअरबस, बल्क ड्रग पार्कचे प्रकल्प गुजरातला का दिले ?