
नांदेड, संभाजीनगर, नागपूरमधील शासकीय रुग्णालयांमध्ये 100हून अधिक रुग्णांचा उपचारांअभावी मृत्यू झाल्यानंतर मिंधे सरकारला जाग आली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक बोलवून आश्वासनांची खैरात केली. राज्यातील 34 जिल्हा रुग्णालये सुपरस्पेशालिटी करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र सध्या रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधील उपचारांचा दर्जा सुधारण्यास मिंधे सरकारने प्राधान्य दिलेले नाही. त्यामुळे नवी रुग्णालये उभारत असताना दुसरीकडे बळी जातच राहणार की काय, असा सवाल केला जात आहे.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत आज मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यात आरोग्यावरील गुंतवणूक, पदभरती आदीबाबत सूचना देण्यात आल्या. येत्या पंधरा दिवसांत सचिवांच्या समितीने नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या जोडीने राज्यातील 34 जिह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त जिल्हा रुग्णालये उभारण्याबाबत आराखडा तयार केला जाणार आहे.
दरम्यान, आरोग्य विभागात 19 हजार 695 पदे रिक्त असून ती भरण्याची कार्यवाही टीसीएसमार्फत सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत ही पदे भरावीत अशी सूचनाही त्यांनी केली.


























































