चांदणी चौकाच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्र्यांची दांडी?

विक्रमी वेळेत बांधलेला पूल, पुण्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा असणारा पूल म्हणून नव्या चांदणी चौक पुलाचे गुणगान गायले जात आहे. या पुलाचे उद्घाटन शनिवारी होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे दोन्ही उपमुख्यंमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे कळते आहे. प्रकृती बरी नसल्याने ते या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील कोल्ड वॉरमुळे शिंदे यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आहे का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शिंदे अडकले होते चांदणी चौकात
एकनाथ शिंदे यांना दहा महिन्यांपूर्वी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. ते साताऱ्याकडे जात असताना चांदणी चौकातील वाहतूक कोंडीत अडकले होते. यानंतर या ठिकाणी वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा निघावा अशी पुणेकरांनी मागणी केली होती. यानंतर लवकरात लवकर चांदणी पुलाचे काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्या शिंदेंना चांदणी चौकात वाहतूक कोंडीचा फटका बसला होता, तेच शिंदे या पुलाच्या उद्घाटनाला येणार नसल्याने सगळ्यांना आश्चर्य वाटायला लागलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांच्या अख्यत्यारित खात्यांचा अजित पवार यांनी आढावा घेतल्याने शिंदे त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे त्यांनी समारंभाला न येण्याचा निर्णय घेतला असावा असे बोलले जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी हात जोडले

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपमध्ये वादाचा स्फोट झाला आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतदेखील साध्या नावाचा उल्लेखदेखील नसल्याने कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी हा तर माझे अस्तित्व संपविण्याचा कट, असे म्हणत सोशल मीडियावर पोस्ट टाकून पक्षाबद्दलची जाहीर नाराजी व्यक्त केली. तसेच कोथरूडचे सध्याचे आधुनिक नेते यांनी चांदणी चौकाच्या विषयात काही केले नसल्याची टीका नाव न घेता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे. याबाबत पाटील यांना मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाला येणार का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडत तिथून काढता पाय घेतला.

कोथरूड विधानसभा मतदारसंघ 2019 मध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांना सोडावा लागला. त्यानंतर त्यांना अनेक संधींमधून भाजपकडून डावलले गेले. त्यांनी याबाबत वेळोवेळी आपली नाराजी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती. शनिवारी (दि. 12) चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार असून, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. मात्र, निमंत्रण पत्रिकेत कुलकर्णी यांचे नाव नाही. त्या पार्श्वभूमीकर मेधा कुलकर्णी यांनी ‘असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे’ असे शीर्षक देत भाजपमध्ये कसे डावलले जाते याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. या नाराजीतून मेधा कुलकर्णी यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. मेधा कुलकर्णी यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना टॅग केले आहे.

काय म्हटले कुलकर्णींनी?

-सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टला ‘असे निष्ठावंतांचे डावललेले जिणे’, असे शीर्षक मेधा कुलकर्णी यांनी दिले आहे. त्या म्हणतात, ‘माझ्यावरील कुरघोडय़ा, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दु:ख माbत नाही मनात. वाटले बोलावे तुमच्याशी.’

– चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण, मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वत: गडकरी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले होते, ‘तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या सांगण्याकरून मी हा मुद्दा घेतला.’

– अनेक असे संदर्भ देता येतील की, ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ याविषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकटय़ाचेच असल्यासारखे कागणारे कोथरूडचे सद्य नेते माझ्यासारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?

– मध्यंतरी पंतप्रधान मोदी, अमित शहा पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्षपदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन, तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या-त्या वेळी गोष्टी वरिष्ठांपुढे मांडल्या आहेत.