मतदानाची ऐशी की तैशी! आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममध्ये दुसऱया टप्प्यातील मतदानादरम्यान भाजप उमेदवाराच्या गाडीतच ईव्हीएम मशीन आढळून आले आहे. याप्रकरणी चार अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले असून निवडणूक आयोगाने करीमगंज जिल्हा निवडणूक अधिकाऱयांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आसाम विधानसभेच्या 39 जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. मतदानानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओत एका खासगी गाडीत ईव्हीएम मशीन सापडले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या गाडीमध्ये हे ईव्हीएम मशीन सापडले ती गाडी पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपचे उमेदवार कृष्णेंदू पाल यांची असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विरोधकांनी भाजपवर टीका करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

आयोगाचे म्हणणे काय?

मतदान यंत्र घेऊन जाणारी निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱयांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही गाडी भाजप उमेदवाराची असल्याचे समजले असा खुलासा निवडणूक आयोगाने केला आहे.

गाडीमध्ये मतदान अधिकारी नव्हता

लोकांनी या घटनेची तक्रार केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गाडीमध्ये ना मतदान अधिकारी होता, ना निवडणूक आयोगाचा कर्मचारी.

आयोगाच्या निष्पक्षतेला रामराम म्हणायचे का? – प्रियंका गांधी

‘क्या स्क्रिप्ट है?’ असे म्हणत प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षकतेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाच्या गाडीत बिघाड झाला. त्याचवेळी तिथे एक गाडी प्रकट झाली. ती गाडी भाजप उमेदवाराची निघाली. निष्पाप निवडणूक आयोगाने त्यातूनच प्रवास केला. प्रिय निवडणूक आयोग, हे काय प्रकरण आहे? यावर तुम्ही देशाला स्पष्टीकरण देऊ शकता का? आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेला रामराम म्हणायचे का, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे.

पुन्हा मतदान घेणार

राताभरीतील एमव्ही शाळेत असलेल्या केंद्र क्रमांक 149 वर 1 एप्रिल रोजी रात्री 9.20 वाजता ही घटना घडली. ईव्हीएम मशीनसोबत कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नाही. मात्र ज्या गाडीतून मतदान यंत्र नेण्यात आले ती भाजप उमेदवाराशी संबंधित असल्याने या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.