
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना आणि भाजप यांची गेल्या 25 वर्षांची अभेद्य युती आहे आणि राहील. आता आपापसातील कटुता विसरून एकच ध्येय ठेवून एकदिलाने निवडणूक लढायची आणि लोकसभेवर भगवा फडकवायचा. युतीचे दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांना मागच्यापेक्षाही भरघोस मतांनी निवडून आणायचे, असा निर्धार दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी आज केला. येत्या 9 एप्रिल रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली सभा दक्षिण मुंबईत होणार असल्याची माहिती शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी निर्धार मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिली.
शिवसेना-भाजप युतीचा कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा रविवारी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडला. या वेळी दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, शिक्षण मंत्री विनोद तावडे, भाजप नेत्या शायना एन.सी., आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राज पुरोहित, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, मीना कांबळी, राजकुमार बाफना, भाजप प्रवक्ते मधू चव्हाण, नगरसेवक अतुल शाह, विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, तसेच महिला आघाडी संघटक जयश्री बाळ्ळीकर, नंदा वर्मा, भाजप दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गमरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अनिल देसाई म्हणाले, 9 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांची पहिली सभा दक्षिण मुंबईत होणार असून त्याचे आयोजन आपल्या सगळय़ांना बसून करायचे आहे. तसेच शिवसेना-भाजपच्या समन्वयासाठी गिरगाव चौपाटी येथे सुसज्ज कार्यालय उभारण्यात येणार आहे. लवकरच त्याचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहितीही देसाई यांनी या वेळी दिली.
ज्यांच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला, तेच आमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करीत आहेत. त्यांची लायकी तरी आहे का, खोटे आरोप करणाऱयांना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक आहे, पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केल्यानंतर पाठीवर थाप घेण्याची ही निवडणूक आहे. शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जुने दिवस आठवून एकजुटीने काम केले पाहिजे, असे प्रतिपादन विनोद तावडे यांनी केले. अहमदाबाद येथील कालचे उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकून आता आमच्या कुणाच्याही मनात काहीच प्रश्न उरलेले नाहीत. शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणुका लढल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही. मागील 25 वर्षे आपली नैसर्गिक मैत्री होतीच, पुढील 25 वर्षेही एकत्र राहू, असा विश्वास भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
23 मे रोजी गुलाल उधळूया – अरविंद सावंत
शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते भगव्याशी कधीच प्रतारणा करणार नाहीत. मी गेल्या वर्षी दक्षिण मुंबई मतदारसंघातून एक लाख 28 हजार मताधिक्याने विजयी झालो होतो. आता मिलिंद देवरा हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्याने त्यांचा मागच्यापेक्षा दुप्पट मतांनी पराभव करूया आणि 23 मे रोजी गुलाल उधळूया, असा विश्वास अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.
मुंबादेवीच्या दर्शनाने आज प्रचाराचा शुभारंभ
दक्षिण मुंबईचे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अरविंद सावंत सोमवार, 1 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मुंबादेवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. या वेळी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचार रॅलीत मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ आणि आमदार राज पुरोहित यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार पूनम महाजन यांनी रविवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह खासदार अनिल देसाई, आमदार ऍड. अनिल परब, भाजप आमदार पराग अळवणी, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर आदी उपस्थित होते.


























































