नगर महानगरपालिकेसाठी रविवारी होणार मतदान, 41 मतदान केंद्रे अतिसंवेदनशील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

सामना प्रतिनिधी । नगर

नगर महानगरपालिकेची निवडणुक रणधुमाळी शनिवारी संपली. शहरातील 68 जागांसाठी 339 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून उद्या दि. 9 रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याने प्रशासनाच्या वतीने त्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक प्रभागामध्ये दुरंगी, तिरंगी लढती आहे. विद्यमान महापौर सुरेखा कदम यांच्यासह शिवसेनेचे अनेक दिग्गज या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. 41 मतदान केंद्र हे अतिसंवेदनशील असल्याने तेथे मतदान कसे होणार हे पाहणे गरजेचे आहे. तर केडगाव येथील निवडणुकीकडे शहराचे लक्ष लागले आहे.

उद्या सकाळी 7.30 वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. प्रचारसभा मतदारांच्या गाठीभेटी, जाहीरसभा या माध्यमातून गेल्या आठ दिवसापासून प्रचाराची रणधुमाळी पहायला मिळाली. उदया सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

नगर शहरात मतदान शांततेत पार पडावे यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह शहरात नेमलेले आचारसंहितेचे पथक या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. शासनाच्या वतीने मतदारापर्यंत स्लीप देण्याचा उपक्रम राबवला गेला. मात्र, बहुतांश ठिकाणी त्या स्लिमचे वाटपही झाले नाही. अनेकांना अ‍ॅपद्वावरेच इच्छुक उमेदवारांनी यंत्रणा राबवून आपल्या उमेदवारीच्या स्लिमा मतदारापर्यत पोहचवण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. मतदान केंद्राच्या परिसरात 144 कलम लागु करण्यात आला आहे. मोबाईल व अन्य साहित्य नेण्यास सुध्दा प्रशासनाने बंदी घातली आहे. शहरात 41 अतिसंवेदनशील मतदानकेंद्र आहेत. या ठिकाणी चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे.

शिवसेना व भाजपा स्वतंत्र लढत असतांना काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडी एकत्रित निवडणुक लढत आहे. अनेक ठिकाणी काट्याची टक्कर असल्याने तेथेही वातावरण चांगलेच तापले गेले आहे. प्रचार जरी थांबला असता तरी निवडणुका होईपर्यंत मतदारांच्या गाठीभेटी या सुरुच आहे. अनेक ठिकाणी लक्ष्मीदर्शन झाल्याची चर्चा गेल्या दोन दिवसापासून शहरापासून सुरु होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्याची सभा असताना भाजप उमेदवारांस नोटा वाटतांना रंगेहात पकडण्यात आले. आजही अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना घडल्याचे बोलले गेले मात्र कोणतीही तक्रार सायंकाळपर्यत दाखल झालेली नव्हती. 17प्रभाग असून एकणू 2000 मतदार यंत्रे तैनात करण्यात आली आहे. साधारणता 750 ते 800 मतदारांचे एक मतदार केंद्र आहे. मतदान केंद्रावर नेमलेले अधिकारी, कर्मचारी, उमेदवार तसेच प्राधिकृत केलेले पत्रकार, फोटोग्राफर व अन्य कर्मचारी या व्यक्तींना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी सांगितले आहे.