गृहवित्त महामंडळाच्या निवडणुकीत प्रगती पॅनलचे चारही उमेदवार विजयी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नांदेड

महाराष्ट्र स्टेट को-ऑप. हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (गृहवित्त महामंडळ) च्या संचालक मंडळासाठी निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत संभाजीनगर विभागात सर्वसाधारण मतदारसंघात प्रगती पॅनलचे चारही उमेदवार विजयी झाले, त्यात माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक हरिहर भोसीकर व दिलीप चव्हाण यांचा समावेश आहे. नांदेडचे दुसरे माजी अध्यक्ष गंगाधरराव पटणे यांचा तसेच निवडणुकीत भाजपने उतरविलेल्या सहकार पॅनेलचा धुव्वा उडाला.

मागील एक महिन्यापासून या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. १ जुलै रोजी ठिकठिकाणी मतदान घेण्यात आल्यानंतर मंगळवारी मुंबई येथे मतमोजणी करण्यात आली. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत चाललेल्या मतमोजणीतून संपूर्ण निकाल समोर आला. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रगती पॅनलला २१ पैकी १६ जागा मिळाल्या तर पाच ठिकाणी सहकार पॅनलचे उमेदवार निवडून आले. या पॅनलला सर्वसाधारण मतदारसंघात मुंबई विभागात दोन्ही जागा मिळाल्या. महामंडळाचे माजी अध्यक्ष व आमदार सतीश पाटील यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते.

या निवडणुकीत सर्वसाधारण मतदारसंघात सर्वाधिक (०४) जागा संभाजीनगर विभागात होत्या. या मतदारसंघात प्रगती पॅनलचे हरिहरराव भोसीकर (११५) मते, दिलीप चव्हाण (११०) सुनील जाधव (१०५) आणि जयसिंह पंडित (८०) हे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. मतदारांचा विश्वास आणि नेत्यांचे पाठबळ यामुळे हा विजय मिळाल्याचे भोसीकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री राजेश टोपे यांचे चुलत बंधू संजय टोपे यांनी या निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यांच्यासह सहकार पॅनलचे मराठवाड्यातील सर्व उमेदवार पराभूत झाले. त्यामध्ये रविंद्र देशमुख-परभणी, विजय गंभीरे व निशा विजय सोनवणे-नांदेड यांचा समावेश आहे. महिलांसाठी असलेल्या दोन जागा तसेच अनुसूचित जाती-जमाती एक जागा, इतर मागासवर्ग-एक जागा या चारही जागांवर प्रगती पॅनलचे उत्तमराव शिंदे, वसंतराव घुईखेडकर, श्रीमती जयश्री पाटील व श्रीमती शैलजा लोटके या विजयी झाल्या. तसेच अन्य एका राखीव प्रवर्गात प्रगती पॅनलचे विजय पाटील यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रशांत सोनवणे यांनी काम पाहिले.

अन्य विजयी उमेदवार

  • सर्वसाधारण मतदारसंघ मुंबई विभाग-सिताराम राणे व दत्तात्रय वडेर
  • पुणे विभाग-सागर काकडे, ललित चव्हाण व विश्वास पाटील
  • नाशिक विभाग-वसंत गीते, सतीश पाटील व बाळासाहेब सानप
  • नागपूर विभाग- महेश भांडेकर व राकेश पन्नासे
  • अमरावती विभाग-दीपक कोरपे, अजय पाटील