नगरमधील 21 सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर, उपनिबंधक गणेश पुरी यांची माहिती

राज्य सरकारने ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गांतील सहकारी संस्थांच्या निवडणुका 20 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे आदेश येथील प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. नगर जिह्यातील नगर शहर बँक, मर्चंट्स बँकेसह 21 संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याची माहिती नगरचे जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली.

नगर जिह्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गांतील अशा 21 संस्थांचा यामध्ये समावेश होता. यांतील शहर सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, 11 डिसेंबरला मतदान होणार होते. कालच चिन्हाचे वाटप करण्यात आले होते. तर, नगर मर्चंट्स बँकेची मतदारांची प्रारूप यादी दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली होती. इतर संस्थांच्या निवडणुकाही होणार होत्या. मात्र, आता या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.