
अकरावी ऑनलाइन प्रवेशात सुलभता येण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मोबाईल ऍपची निर्मिती केली आहे. दहावीचे विद्यार्थी पीओईएएम या ऍपच्या माध्यमातून आपल्या ऍण्ड्रॉईड मोबाईल फोनवरून ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज भरू शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्याकडील मोबाईल फोनवर पीओईएएम (प्रोसेस ऑफ इलेव्हन ऍडमिशन इन महाराष्ट्र) हे मोबाईल ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.
गुगल प्ले-स्टोअर तसेच आयओएसवर हे ऍप उपलब्ध आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील एकूण 1 हजार 508 कॉलेजांमधील तब्बल 5 लाख 13 हजार 775 जागांसाठी विद्यार्थी या ऍपवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच ऑनलाइन फी भरणा, कागदपत्रांचे सादरीकरण, व्हेरिफिकेशन, कॉलेज पसंतीक्रमही या ऍपच्या माध्यमातून भरू शकतात. सध्या हे ऍप्लिकेशन केवळ ऍण्ड्रॉईड फोनवर उपलब्ध असून लवकरच आयफोनवरही ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.































































