
एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेले प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांची शनिवारी दुपारी तळोजा कारागृहातून सुटका झाली. या वेळी माध्यमांशी बोलताना तेलतुंबडे यांनी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
‘‘कारागृहातून सुटका झाल्याचा निश्चितच आनंद आहे, पण मला खोटय़ा गुन्ह्यात अटक करून 31 महिने कारागृहात डांबून ठेवण्यात आले त्याचे दुःख आहे,’’ अशी प्रतिक्रिया तेलतुंबडे यांनी दिली. आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. खोटे आरोप ठेवण्यात आले. जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी अडीच वर्षे कारागृहात काढावी लागली, हे सगळंच क्लेशदायक असल्याचेही ते पुढे म्हणाले.
तेलतुंबडे यांचा माओवादी कारवायांत सकृतदर्शनी सहभाग स्पष्ट होत नसल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. त्याला एनआयएने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, मात्र उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानेही योग्य ठरवला. त्यामुळे तेलतुंबडे यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
एल्गार परिषद आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एनआयएने एकूण 16 जणांना अटक केली असून त्यात आनंद तेलतुंबडे यांचाही समावेश आहे. या प्रकरणात गेल्या शनिवारी गौतम नवलखा यांची जामिनावर सुटका झाली होती. त्यांना एक महिना घरात नजरपैदेत राहावे लागणार आहे. यादरम्यान लॅपटॉप, मोबाईल, पंप्युटर याचा वापर त्यांना करता येणार नाही. याशिवाय कवी वरवरा राव यांना तब्येतीच्या कारणावरून जामीन दिला गेला आहे तर वकील सुधा भारद्वाज यांचीही जामिनावर सुटका झाली आहे.
z जामिनावर सुटका होऊन तेलतुंबडे कारागृहाबाहेर आले तेव्हा त्यांची पत्नी रमा आंबेडकर या तिथे उपस्थित होत्या. रमा ही घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नात आहे. तेलतुंबडे यांना जामीन देताना काही अटी घालण्यात आल्या असून खटला पूर्ण होईपर्यंत मुंबई विशेष एनआयए कोर्टाच्या अधिकार क्षेत्रातच तेलतुंबडे यांना राहावे लागणार आहे.
आंबेडकर जयंतीला अटक, संविधान दिनी सुटका!
आनंद तेलतुंबडे हे 14 एप्रिल 2020 रोजी मुंबईत एनआयए कार्यालयात हजर झाले होते. त्याचा उल्लेख करत तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई म्हणाले, तेलतुंबडे यांना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अटक केली गेली आणि आज दोन वर्षांनंतर त्यांची सुटका होतेय तो दिवस संविधान दिन आहे, याचा मला आनंद आहे.

























































