अब्जाधीश म्हणाला कोरोना लस घेणार नाही… ‘हे’ दिलं कारण…

कोरोनाची लस आल्यावरही आपण ती लस घेणार नाही, असे अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनी म्हटले आहे. एलन मस्क याचा जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश होत असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. ते स्पेसएक्स आणि टेस्ला कंपनीचे मालक आहेत. तसेच कोरोनाबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यांची नेहमी चर्चा होत असते. आता त्यांनी कोरोना लसीबाबत केलेल्या विधानाची चर्चा होत आहे.

कोरोनापासून आपल्याला किंवा आपल्या कुटुंबाला कोणताही धोका नसल्याने आपण लस घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संकटामुळे अमेरिकेत लॉकडाऊनच्या काळातही मस्क यांनी टेस्ला फॅक्टरी सुरू ठेवली होती. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी घेण्यात आलेले लॉकडाऊन अयोग्य आणि अनैतिक असल्याचे त्यांचे मत आहे. कोरोना महामारीच्या काळात कार्यालयात येणे असुरक्षित वाटत असलेल्यांना त्यांनी नोकरीतून काढून टाकले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन मोठी चूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन लागू करण्याऐवजी धोका असलेल्या आणि संक्रमित व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्याची गरज होती, असेही त्यांनी सांगितले.

आपल्याला आणि आपल्या कटुंबियांना धोका नाही. त्यामुळे आपण किंवा आपले कुटुंबिय लस घेणार नसल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. मस्क नेहमी मानवता वाचवणे, अंतराळ विज्ञानाला चालना देणे, पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर यावर जोर देतात. मात्र, ते आता लसीला का विरोध करत आहेत, असे विचारल्यावर ते म्हणाले, आपल्याला कशाची गरज आहे, याचा विचार करावा. सध्या कोणत्याही आजाराने होणाऱ्या मृत्यूला कोरोनाचे लेबल लावले जात आहे. जनतेत भीती पसरवली जात आहे. मात्र, लॉकडाऊन हा कोणत्याही समस्येवर उत्तर होऊ शकत नाही. लॉकडाऊनमुळे लोकांची तर्कशक्ती घटल्याचेही ते म्हणाले. या आजारापासून आपल्याला धोका नाही. तसेच याची आपल्याला भीतीही वाटत नाही, त्यामुळे आपण लस घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या