
ग्रेट ब्रिटनच्या 18 वर्षीय एम्मा राडुकानूने किताबी लढतीत कॅनडाच्या 19 वर्षीय लेलाह फर्नांडिज हिचा पराभव करत यूएस ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावित इतिहास घडविला. तब्बल 53 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकणारी एम्मा राडुकानू ही पहिली ब्रिटिश महिला टेनिसपटू ठरली, हे विशेष.
एम्मा राडुकानूने लेलाह फर्नांडिजचा 6-4, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत विजेतेपदावर नाव कोरले. महिला एकेरीच्या ऐतिहासिक अंतिम लढतीत यापूर्वी कधीही ग्रॅण्डस्लॅम फायनल न खेळलेल्या दोन तरुण खेळाडू एकमेकांना भिडल्या. दोघीही अंतिम फेरीत दाखल होताच या वर्षीच्या महिला एकेरीत यूएस ओपनला नवी राणी मिळणार हे निश्चित झाले होते.
क्रमवारीत झेप
एम्मा राडुकानू हिने यूएस ओपनच्या विजेतेपदानंतर जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानी झेप घेतली आहे. काही दिवसांपूर्वी एम्मा राडुकानू 150 व्या क्रमांकावर होती. शिवाय दोन आठवडय़ांपूर्वी तिचे नावही टेनिस जगताला परिचित नव्हते. पात्रता फेरी खेळल्यानंतर ग्रॅण्डस्लॅम जिंकणारी ती पहिली टेनिसपटू ठरली आहे. याआधी पुरुष किंवा महिला यांपैकी कोणीही पात्रता फेरीतून येऊन थेट जेतेपदाला गवसणी घालण्याचा पराक्रम केलेला नाही.
व्हर्जिनियानंतर…
व्हर्जिनिया वेड या ग्रेट ब्रिटनच्या महिला टेनिसपटूने 1968 साली अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर ग्रेट ब्रिटनच्या एकाही महिला टेनिसपटूला असा करिष्मा करता आलेला नव्हता. त्यानंतर तब्बल 53 वर्षांनंतर एम्मा राडुकानू हिने यंदा अमेरिकन ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकलीय. तसेच 1977 साली व्हर्जिनिया वेड हिने विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम जिंकले होते. त्यानंतर थेट 44 वर्षांनंतर एम्मा राडुकानूच्या रूपात ग्रेट ब्रिटनच्या महिला टेनिसपटूला एकेरीत ग्रॅण्डस्लॅम जिंकता आलेले आहे.
पदार्पणात यूएस ओपन जिंकणारी दुसरी
यूएस ओपनच्या इतिहासात पदार्पणातच अंतिम फेरीत धडक देणारी एम्मा राडुकानू ही चौथी महिला टेनिसपटू ठरली. तिच्या आधी पाम श्राइवर (1978), व्हीनस विल्यम्स (1997) व बियांका एण्ड्रीस्कू (2019) या तीन खेळाडूंनी यूएस ओपनची अंतिम फेरी गाठली होती. एण्ड्रीस्कूनंतर पदार्पणातच यूएस ओपनचा किताब जिंकणारी एम्मा राडुकानू ही दुसरी महिला खेळाडू ठरलीं.
























































