‘ठाकरे’साठी ‘चीट इंडिया’ची माघार, रिलीज डेट बदलली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या बहुचर्चित सिनेमासाठी ‘चीट इंडिया’ या हिंदी चित्रपटाची रिलीज डेट निर्मात्यांनी बदलली आहे. ‘ठाकरे’ 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. याच दिवशी इम्रान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ रिलीज होणार आहे. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ‘चीट इंडिया’ चित्रपट 25 ऐवजी 18 जानेवारीलाच रिलीज करण्याचा निर्णय निर्माते भूषण कुमार यांनी घेतला आहे.

आज मुंबईत एका भरगच्च पत्रकार परिषदेत ‘चीट इंडिया’च्या निर्मात्यांनी ही घोषणा केली. यावेळी शिवसेना नेते युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, ‘ठाकरे’ चित्रपटाचे निर्माते शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह अभिनेता इम्रान हाश्मी, तनुज गर्ग, अतुल कसबेकर हेसुद्धा उपस्थित होते.

‘चीट इंडिया’ या सिनेमातून आम्ही शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा मांडला आहे. बाळासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी तसेच सिनेमाच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आम्ही आठवडाभर आधीच चित्रपट प्रदर्शित करत आहोत. जेणेकरून आमच्या सिनेमाच्या व्यवसायावर देखील याचा परिणाम होणार नाही. हे दोन्ही सिनेमे चांगला व्यवसाय करतील अशी मला आशा आहे, असे ‘चीट इंडिया’चे निर्मातो भूषण कुमार यांनी सांगितले.

बाळासाहेबांच्या प्रेरणेमुळेच एकत्र आलो!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकारणी नव्हते तर ते कलाकारदेखील होते. शिवसेनाप्रमुखांनी नेहमी ‘जियो और जिने दो’ हा संदेश दिला. बाळासाहेबांनी फिल्म इंडस्ट्रीवर फक्त प्रेम केले नाहील्ल, तर वेळप्रसंगी कलाकारांच्या, निर्मात्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्यादेखील सोडवल्या. आज त्यांच्या प्रेरणेमुळेच आम्ही सगळे एकत्र येऊन एकमेकांना मदत करतोय, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यावेळी म्हणाले.

‘चीट इंडिया’ आणि ‘ठाकरे’ हे दोन्ही सिनेमे माझ्या जवळचे आहेत. ‘ठाकरे’ हा सिनेमा माझ्या आजोबांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. बाळासाहेब हे लार्जन दॅन लाइफ व्यक्तिमत्त्व होते. नवाजने त्यांच्या भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. तर ‘चीट इंडिया’ सिनेमाच्या निर्मितीप्रक्रियेपासूनच मी निर्माते अतुल कसबेकर, तनुज यांच्या संपर्कात होतो. बाळासाहेबांवरच्या आदरामुळे आम्ही ‘ठाकरे’ सिनेमासोबत क्लॅश करणार नाही हे त्यांनी आधीच मला सांगितले होते. प्रेक्षक आधी चीट इंडिया पाहून शिक्षणव्यवस्थेविषयी आपला राग व्यक्त करतील तर पुढच्या आठवडय़ात ‘ठाकरे’ हा सिनेमा पाहून अन्यायाविरुद्ध लढण्याची बाळासाहेबांकडून प्रेरणा घेतील.
– आदित्य ठाकरे, शिवसेना नेते- युवासेना प्रमुख