नॅशनल स्टॉक एक्स्चेंज प्रकरण – संजय पांडे यांचा ईडीने नोंदवला जबाब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आज दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीकरिता हजर झाले. 30 जून रोजी पोलीस आयुक्तपदावरून निवृत्त झाल्यानंतर तीनच दिवसांत त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज प्रकरणात ईडीने आज त्यांचा जबाब नोंदवला.

संजय पाडे यांना ईडीने नॅशनल स्टॉक एक्स्चेंज प्रकरणात समन्स बजावले आहे. पोलीस सेवेतून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी 2001 मध्ये स्वतःचे आयटी ऑडिट आयसेक सर्व्हिस प्रा. लि. असे नाव फर्म सुरू केले होते. यादरम्यान वरिष्ठ अधिकाऱयांकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला न गेल्याने त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावे लागले. त्यावेळी संजय पांडे यांनी आपली आई आणि मुलाला फर्मचे संचालक केले होते. या फर्मला एनसई सर्व्हर आणि सिस्टम्सचे आयटी ऑडिट कॉण्ट्रक्ट देण्यात आले होते. त्यावेळी पांडेंच्या फर्मने दिलेल्या अहवालात कोणतेही उल्लंघन झाले नाही, असे नमूद करण्यात आले होते. त्यावरून सीबीआयने फर्मची चौकशी सुरू केली होती. याप्रकरणी आता ईडी चौकशी करत असून आज त्यांचा जबाब नोंदवण्यात आला.

संजय पांडे चौकशीसाठी रिक्षातून कार्यालयात

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे ईडी कार्यालयात रिक्षातून पोहोचले. 11.20 वाजता ईडीच्या कार्यालयात पोहोचलेल्या पांडे यांची तीन तास चौकशी करण्यात आल्यानंतर दुपारी त्यांना जेवणाच्या सुट्टीसाठीही सोडण्यात आले होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त रिक्षातून ईडी कार्यालयात पोहोचल्याची चर्चा देशभरातील प्रसिद्धीमाध्यमांत रंगली.

विवोच्या 44 कार्यालयांवर धाडी

ईडीकडून चिनी कंपनी विवोच्या 44 कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांतील विवोच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या कंपनीविरोधात मनी लॉण्डरिंगप्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे.