भूक मिटवणारी गोळी आली, अन्नाचा एक कणही न खाता पोट भरणार

अन्नाचा एक कणही न खाता माणसाचे पोट भरणार आहे. संशोधकांनी अशी एक गोळी तयार केली आहे जी गिळता येईल आणि व्हायब्रेट होणारी असेल. गोळी खाल्ल्यानंतर ती पोटात जाईल आणि व्हायब्रेट होईल ज्यामुळे मेंदूला सिग्नल मिळेल की पोटात जेवण पोहोचलं आहे. ज्यामुळे गोळी खाणाऱ्याला मेंदू संकेत देईल की त्याचे पोट भरले आहे.

भूक भागवणाऱ्या या गोळीची संकल्पना मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील संशोधक श्रिया श्रीनिवासन यांची आहे. ही गोळी घेतली की 20 मिनिटांनी आपल्याला जेवल्यानंतर पोट भरतं तसे वाटण्यास सुरुवात होते. ही गोळी लठ्ठपणा नियंत्रणात आणण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांमध्ये प्रभावी ठरेल असा दावा केला जात आहे. श्रीनिवासन या सध्या हार्वर्ड विद्यापीठात बायो-इंजिनिअरिंगच्या सहाय्यक प्राध्यापक आहेत.

या गोळीसंदर्भातील अहवालात असे म्हटले आहे की जेव्हा जेवतो किंवा खातो तेव्हा पोट ताणले जाते. ज्यामुळे मेंदूला संदेश मिळतो की पोट भरले आहे. मेंदूला हा संदेश मिळाल्यानंतर आपण जेवलो असून आता आपले पोट भरले असल्याची जाणीव मानवाला व्हायला लागते. भूक भागवणारी ही गोळी खाल्ल्यानंतर न खाता ही सगळी प्रक्रिया होते. ही गोळी छोट्या आकाराच्या सिलव्ह्र ऑक्साईड बॅटरीने संचालित केली जाते, ज्याद्वारे 30 मिनिटांपर्यंत पोटात कंपने निर्माण केली जाऊ शकतात. कंपने संपल्यानंतर भूक लागल्याची जाणीव नष्ट होते.