२८ वर्षांनंतर इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, समारा

गॅरेथ साऊथगेटच्या मार्गदर्शनाखाली आणि हॅरी केनच्या नेतृत्वात फुटबॉलच्या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या इंग्लंडच्या फुटबॉल संघाने शनिवारी स्वीडनला २-० अशा फरकाने हरवले आणि सेमी फायनलमध्ये धडक मारली. इंग्लंडने तब्बल २८ वर्षांनंतर वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. याआधी १९९० साली त्यांना सेमी फायनलमध्ये पोहोचता आले होते. हॅरी मॅग्वायर व डेली अली यांनी दमदार गोल करीत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडसमोर आता क्रोएशिया व रशिया यांच्यामधील विजेत्याचे आव्हान असणार आहे.

पूर्वार्धात केन ऍण्ड कंपनीची आघाडी

इंग्लंड व स्वीडन यांच्यामधील लढतीत इंग्लंडचे पारडे जड समजले जात होते. मैदानातही त्याचाच प्रत्यय दिसून आला. पण २९व्या मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. अखेर इंग्लंडने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी साधली. ऍश्ले यंगच्या किकवर हॅरी मॅग्वायरने हेडरवर दमदार गोल केला.

५९ व्या मिनिटाला दुसरा गोल

इंग्लंडच्या फुटबॉलपटूंनी उत्तरार्धातही आपली शानदार कामगिरी सुरूच ठेवली. ५९ व्या मिनिटाला डेली अलीने हेडरवर गोल करून इंग्लंडला २-० अशा फरकाने पुढे नेले. तसेच ही आघाडी निर्धारित वेळेपर्यंत कायम ठेवण्यात त्यांना यश मिळाले.

सलग चौथ्या विश्वचषकात दादागिरी

युरोप खंडातील देशांचे वर्चस्व २००६ वर्ल्ड कपपासून सुरू झाले आहे. तिथपासून सुरू झालेली ‘दादागिरी’ २०१८ पर्यंतही कायम राहिली आहे. इटलीने २००६ मध्ये, स्पेनने २०१० मध्ये, जर्मनीने २०१४ मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे. आता फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, क्रोएशिया व रशिया यांच्यापैकी एक देश वर्ल्ड चॅम्पियन होणार आहे. हे सर्व देश युरोप खंडातीलच आहेत.

capture-2