पर्यटनाचा आनंद लुटा; पण जरा जपून…! वन विभागाचा पर्यटकांना सबुरीचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यात पश्चिम घाटातील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे वर्षा पर्यटनासाठी लोक मोठय़ा प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत. मात्र, पाणी, चिखल, शेवाळल्यामुळे आलेला निसरडेपणा याचा विचार न करता पर्यटकांकडून धबधब्यांच्या ठिकाणी हुल्लडबाजी होत असल्याचे चित्र आहे. हा अतिउत्साह जीवावरही बेतू शकतो. त्यामुळे ‘पर्यटनाचा आनंद लुटा, पण जरा जपून’ असा सबुरीचा सल्ला वन विभागाने पर्यटकांना दिला आहे.

सातारा जिह्यातील ठोसेघर, वजराई-भांबवली, केळवली-सांडवली, एकीव, महाबळेश्वरजवळील लिंगमळा, कोयनेजवळील ओझर्डे धबधबा तसेच पाटण तालुक्यातील सडावाघापूरचा रिव्हर्स फॉल पाहण्यासाठी साताऱयासह अन्य जिह्यांतूनही हौशी पर्यटक येत असतात. गेल्या काही दिवसांतील संततधार पावसामुळे सातारा तालुक्यातील ठोसेघर, वजराई-भांबवली धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत आहे. याचबरोबरच केळवली-सांडवली, एकीव धबधबाही गेल्या चार दिवसांपासून पूर्ण क्षमतेने वाहत आहे.

पश्चिम घाटातील मुसळधार पावसाने लोक उल्हासित झाले असून, वर्षा पर्यटनासाठी बाहेर पडू लागले आहेत. पावसात आणि धबधब्याच्या ठिकाणी मनसोक्त भिजण्याचा, पावसाळी वातावरणाचा तसेच निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी दररोज शेकडो पर्यटक या ठिकाणी गर्दी करत आहेत. विशेषतः तरुणाईमध्ये याबाबतीत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. धबधबा पाहाता यावा, यासाठी धबधबा परिसरात सुरक्षित पॉइंट्स उभारले आहेत. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक त्याठिकाणी उभारलेले बॅरिकेड्स ओलांडून धबधब्याजवळ तसेच पात्रात सेल्फी काढण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे.

…तर जीवाला धोका संभवतो

पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे, वाटा घसरडय़ा असल्यामुळे तसेच पावसाचा जोर अधूनमधून अचानक वाढत असल्याने पात्रात जाणाऱ्या पर्यटकांच्या जीवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. धबधबा परिसरात अप्रिय घटना होऊ नये, यासाठी वन विभागाने या ठिकाणी जास्तीचे कर्मचारी नेमले असून, आवश्यक त्याठिकाणी स्थानिकांची मदत घेण्यात येत आहे. येणाऱया पर्यटकांना आवश्यक त्या सूचना करण्याबरोबरच त्याठिकाणची शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी हुल्लडबाजांवरही वन कर्मचाऱयांनी लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटा, पण जरा जपून, असे आवाहन वन विभागाने पर्यटकांना केले आहे.

निसर्गाविरोधात कृती करणे धोक्याचे!

सातारा तालुक्यातील धबधबे पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत. निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यांना सुरक्षिततेबाबत सूचना देऊनही अनेकजण सूचनांचे पालन करत नाहीत. निसर्गाविरोधात केलेली कृती जीव धोक्यात आणू शकते. यामुळे पर्यटकांनी सुरक्षित राहून पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटावा.

– डॉ. निवृत्ती चव्हाण, वनपरीक्षेत्र अधिकारी.