ए.आर.रेहमान यांनी पत्नी सायराला हिंदीत बोलण्यास रोखलं, व्हिडिओ होतोय व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर.रेहमान यांचे मातृभाषेवरील प्रेम सर्वांनाच माहित आहे. त्यांना त्यांच्या मातृभाषेचा अभिमान असून ते कोणतंही भाषण तमिळमध्येच करतात. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ए.आर.रेहमान यांनी पत्नी सायरा बानू यांना हिंदीत बोलायला रोखलं आणि तामिळमध्ये बोलण्यास सांगत आहेत. व्हिडीओमध्ये ‘पोन्नियान सेल्वन 2’ चे संगीतकार ए.आर.रेहमान पत्नी सायरासोबत पुरस्कार स्वीकारताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ए.आर.रेहमान सांगत आहेत की, त्यांची पत्नी त्यांची मुलाखत किती वेळा पाहते.

या क्लिपमध्ये ए.आर. रेहमानच्या पत्नीला ज्यावेळी बोलण्यासाठी माइक दिला त्यावेळी ए.आर.रेहमान त्यांना तामिळमध्ये बोलण्यास सांगत आहे. ए.आर. रेहमान यांनी सांगितले, माझ्या मुलाखती मला पुन्हा पाहायला आवडत नाहीत. सायरा मात्र माझ्या मुलाखती सारख्या सारख्या पाहते, कारण तिला माझा आवाज फार आवडतो. त्यांचे हे वक्तव्य ऐकून सायरा लाजताना दिसत आहेत. त्यानंतर सायराला बोलण्यासाठी माइक दिला जातो आणि त्यावेळीच ए.आर. रेहमान त्यांना हिंदीत नाही तर तामिळमध्ये बोलण्यास सांगतात. मात्र त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो.

सायरा यांनी तामिळ फारसे येत नसल्याने इंग्रजीत त्या बोलल्या की, सर्वांना शुभ संध्याकाळ, माफ करा, मला तामिळ नीट बोलता येत नाही. त्यासाठी कृपया माफ करा. मी फार फार आनंदी असून उत्साही आहे. कारण ए.आर. रेहमान यांच्या आवाजाची मी चाहती असून माझा त्यांच्या आवाजावर प्रेम आहे, मला एवढेच सांगायचे आहे.

ए.आर.रेहमान यांचे मातृभाषेवरील प्रेम जगजाहीर आहे. ए.आर.रेहमान आणि सायरा बानो यांचे 1995 मध्ये लग्न झाले होते. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन अशी तीन मुले आहेत.