
मराठी रंगभूमी दिन आणि दिवाळीच्या सुट्टय़ांचा मुहूर्त साधत मराठी नाटकांचेही बॅक टू बॅक प्रयोग होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही खऱया अर्थाने मनोरंजनाची दिवाळी ठरणार आहे.
5 नोव्हेंबर रोजी मराठी रंगभूमी दिन आहे. दिवाळीच्या सुट्टय़ा आणि रंगभूमी दिनाचे दुहेरी औचित्य साधून नाटकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कोरोनापूर्वी सुरू असलेल्या आणि कोरोनामुळे बंद पडलेल्या नाटकांचे प्रयोग सुरू करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शक प्रयत्नशील आहेत. यामुळे दीड-दोन वर्षे मरगळ आलेल्या नाटय़सृष्टीत चैतन्य आहे.
22 ऑक्टोबरपासून नाटय़गृहे सुरू झाल्यानंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांनी रंगभूमीचा शुभारंभ झाला होता. या दोन्ही नाटकांचे प्रयोग पुढे सुरू राहणार आहेत. ‘अलबत्या गलबत्या’, ‘व्हॅक्युम क्लिनर’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘सुनेच्या राशीला सासू’, ‘सही रे सही’ नाटकांचे प्रयोग लागले आहेत. टप्प्याटप्याने आणखी काही दर्जेदार नाटय़ कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
5 नोव्हेंबरला ‘अलबत्या गलबत्या’ नाटक रंगभूमीवर येत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ‘इब्लिस’ नाटक येईल. डिसेंबरमध्ये आणखी दोन नवीन नाटके येतील. महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि भाऊ कदम यांचा अभिनय असलेले ‘चार्ली’ तसेच मिलिंद पेडणेकर लिखित-दिग्दर्शित ‘वन्स मोअर तात्या’ अशी नव्या नाटकांची नावे आहे, अशी माहिती निर्माते राहुल भंडारे यांनी दिली. निम्म्या प्रेक्षक संख्येत नाटकांचे प्रयोग करणे आर्थिकदृष्टय़ा अडचणीचे आहे. त्यामुळे येत्या काळात पूर्ण क्षमतेने प्रयोग करण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा निर्माते-कलाकारांनी व्यक्त केली आहे.




























































