क्षितिजाच्या पल्याड बघणारी उद्योजिका

क्षितिजाची मर्यादा ओलांडून त्याही पलिकडे पाहणाऱया उद्योजिका म्हणून जिनल जयेश सावला यांचा उल्लेख करावा लागेल. ही द्रष्टी उद्योजिका नियतीने आपल्यापासून हिरावून नेली असली तरीही त्यांनी मुहूर्तमेढ रोवलेली सिल्वर टच कंपनी आणि एक्स्प्रेस टी टॅक्स हे ब्रॅण्ड कायम त्यांच्या स्मृती जागा ठेवतात.

जयेश सावला यांच्याशी विवाहानंतर तीन वर्षांनी जिनल यांनी 1996 मध्ये व्यवसाय करण्याची खूणगाठ मनाशी बांधली.  मध्यमवर्गीय महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी दर्जेदार बॅग उपलब्ध करून द्याव्यात, हे त्यांनी ठरवले आणि आर्थर रोडवर असलेल्या घरातूनच व्यवसायाला सुरुवात केली. विविध ठिकाणी तयार झालेल्या बॅग, पर्सची त्या विक्री करू लागल्या. पण इतरांनी तयार केलेल्या बॅगची, पर्सची गुणवत्ता आणि त्याची किंमत समाधानकारक नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आणि 1998 मध्ये जिनल यांनी स्वतःच बॅग, पर्स, पाऊच तयार करण्यास सुरुवात केली. याठिकाणी कामावर परिसरातील महिला, मुली, मुले त्यांनी घेतली. दिवसभर काम करायचे आणि नाईट कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचे, ही अट त्यांनी कामगार म्हणून काम करणाऱ्यांसमोर ठेवली.

उत्पादनांची गुणवत्ता आणि ऑर्डर देण्याची वेळ पाळण्याचा  दंडक त्यांनी सुरुवातीपासून घालून दिला. लंच बॉक्समधील जिन्नस गरम ठेवणारी एक इन्सुलेटेड बॅग त्यांनी तयार केली. मागणी वाढू लागली,  तसा एक्स्प्रेस आणि टी – ट्रक्स हा ब्रॅण्ड ग्राहकांच्या ओळखीचा होऊ लागला. प्रत्येक दुकानात एक्स्प्रेस आणि टी – ट्रक्सच्या बॅग्ज उपलब्ध होऊ लागल्या.