पर्यावरण दिनीच 50 वर्षे जुना वटवृक्ष आगीत जळून खाक; प्रशासनाचा कानाडोळा

जागतिक पर्यावरण दिन नुकताच सर्वत्र साजरा करण्यात आला असून झाडे लावा पर्यावरण वाचवा हा संदेश त्यानिमित्ताने देण्यात आला मात्र कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर शिवारात शिर्डी लासलगाव रोड नजीक असलेल्या एका भल्यामोठ्या डेरेदार वटवृक्षाच्या झाडाच्या खोडाला आग लावून ते जमीन दोस्त झाल्याने पर्यावरण वाचविण्याच्या संदेशाला हरताळ फासण्यात आल्याचे दिसून येत आहे. कोपरगाव शहर व तालुक्यात दररोज शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे परंतु याकडे प्रशासनाची डोळे झाक होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केले आहेत

सदर वटवृक्ष रस्त्यावर कोसळताना त्यावेळी त्या रस्त्यावरून कोणते वाहन किंवा नागरिक जा ये करत नसल्याने सुदैवाने जिवित हानी टळली आहे. सदरची घटना सहा जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. सदर झाड हे शिर्डी लासलगाव रोडवरच कोसळल्याने वाहना ये जा करताना मोठा अडथळा निर्माण होऊन काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी रस्त्याने जावे लागत होते , शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना व वहानधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

पडलेले वृक्ष हे स्थानिकांनी हटवत वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान सदर वटवृक्षाला आग लागली का लावली गेली होती हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून कोपरगाव शहरासह तालुक्यात रोज असंख्य झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येऊन पर्यावरणाला मोठा धोका पोहचविण्यात येत आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासन डोळे झाक करत असल्याचे दिसून येत आहे तसेच काही नागरिक थोड्या पैशासाठी कोणतीही अडचण नसताना झाडे तोडण्यास देत आहे. अवैध वृक्ष तोडीवर वेळीच आळा घातला नाही तर येणाऱ्या काळात उष्णतेच्या दाहकतेमुळे म्हणा किंवा कोरड्या दुष्काळामुळे अनेक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.