
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
भक्ष्याचा पाठलाग करताना विहरीत कोसळलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने सुरक्षित बाहेर काढले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हातखंबा भूतेवाडी येथील भूते यांच्या मालकीच्या विहीरीत बिबट्या पडला होता.
हातखंबा भूतेवाडी नजिक विहिर आहे. गुरुवारी सकाळी विहिरीतून डरकाळीचा आवाज आला त्यामुळे ग्रामस्थानी विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर त्यांना विहिरीत बिबट्या दिसला.
या घटनेची माहिती जि.प. सदस्य महेश ऊर्फ बाबू म्हाप यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. वनविभागाचे वनक्षेत्रपाल र.शं.कांबळे, वनपाल गुरव, पाटील, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, मिताली कुबल, न्हानू गावडे, राहूल गुंठे, गोसावी यांनी तात्काळ हातखांबा येथे धाव घेतली.
सुरुवातीला बिबट्यासाठी लाकडी फळी खाली सोडण्यात आली. बिबट्यांने तात्काळ फळीचा आधार घेतला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.





























































