
महिलांसमोर अश्लील चाळे करून त्यांची छेड काढण्याच्या आरोपात एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक झाली आहे. नवी दिल्ली येथे ही घटना घडली असून यासाठी एक सोशल मीडिया पोस्ट कारणीभूत झाली आहे.
काय घडलं नेमकं?
दिल्ली येथील द्वारका परिसरात ही घटना घडली. या आरोपीचं नाव पुनीत ग्रेवाल असून तो सध्या ट्रॅफिक विभागाच्या पोलीस आयुक्तांचा सचिव म्हणून काम करतो. यापूर्वी तो पोलीस उपनिरीक्षक होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात छेडछाडीच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. शुक्रवारी एका महिलेने सकाळी जॉगिंगच्या वेळी एका विकृताने गाडीने पाठलाग करत अश्लील चाळे केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकली. सोबत या माणसाच्या गाडीचा फोटोही टाकला. या गाडीवर नोंदणी क्रमांक नव्हता.
छेड काढल्यावर तो तिथून पळून जात होता. त्यामुळे त्याला पकडता येत नव्हतं. या पोस्टनंतर पोलिसांवर दबाव वाढला होता. त्यांनी याच परिसरात अन्य काही महिलांनी केलेल्या तक्रारी तपासल्या. तेव्हा याच पद्धतीने छेडछाड झाल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं.
त्यांनी साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवून फोटोतील गाडीचा तपास सुरू केला. पुन्हा एकदा अशाच छेडछाडीच्या प्रयत्नात असलेल्या पुनीतला पोलिसांनी अटक केली. अटक केल्यानंतर तो एका पोलीस आयुक्ताचा सचिवा आणि माजी पोलीस कर्मचारी असल्याचं उघड झालं. पोलिासंनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.























































