
उत्तर प्रदेशमधील बलिया येथील भाजपचे माजी आमदार, त्यांचा मुलगा आणि अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 मे रोजी पेट्रोल पंपावर किरकोळ वादातून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप करनछपरा गावचा रहिवासी संतोष कुमार सिंह याने केला आहे. यानंतर पोलिसांनी भाजपचे माजी आमदार सुरेंद्र सिंह, त्यांचा मुलगा विद्या भूषण सिंह आणि अन्य 5 जणांवर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
डोकटी पोलीस स्थानकाचे अधिकारी धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाच्या तक्रारीनंतर सर्व आरोपींच्या विरोधात कलम 308, 147, 323 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भाजपच्या ज्या माजी आमदारावर गुन्हा दाखल झाला आहे ते सुरेंद्र सिंह 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बैरिया येथून निवडून आले होते. मात्र 2022 ला पक्षाने त्यांचे तिकीट कापले होते. सध्याही ते पक्षात सक्रिय आहेत.
माजी आमदाराने राजकीय हेव्यादाव्यातून नौदलात असलेल्या तरुणाला मारहाण केली. यावेळी त्याला वाचवण्यासाठी आलेल्या तरुणालाही चोप दिला. तसेच त्यांच्याकडील रोख रक्कम आणि सोन्याची चैनही हिसकावली. उपस्थित लोकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमी तरुणाचे वडील संतोष कुमार सिंह यांनी पोलिसात फिर्याद दिली.
फिर्यादीचा मुलगा ऋतुराज अवध पेट्रोल पंपाजवळ उभा असताना भाजपचे माजी आमदार सुरेंद्र सिंह, त्यांचा मुलगा आणि समर्थक तिथे पोहोचले आणि मुलावर लोखंडी रॉड, लाठ्या काठ्याने हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी धावत आलेला दिनेश कुमारही यात जखमी झाला. स्थानिकांनी त्याला सोनबरसा आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.


























































